मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून आता रत्नागिरीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश कीर यांचे नाव आघाडीवर आहे. नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यावर सनातन संस्थेशी संबंध असल्याच्या आरोपानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्याच्या काँग्रेसमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. विविध स्तरातून बांदिवडेकरांना विरोध होत असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांची पाठराखण करताना त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या चौकशीत तसे स्पष्ट झाले आहे. बांदिवडेकर सनातनची विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत आणि हा विरोध पुढेही कायम राहील, अशी माहिती चव्हाण यांनी का दिली होती.
रमेश कीर यांनी रत्नागिरी काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे. तसेच कोकण म्हाडाचे अध्यक्ष म्हणून देखील कार्यभार सांभाळण्याचा अनुभव गाठीशी
आहे. कीर हे भंडारी समाजातील नेते असून ते व्यावसायिक आहेत.
दरम्यान, बांदिवडेकर हे सनातन संस्थेचे कोकण विश्वस्थ आहेत. इतकच नाही तर नालासोपारा बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याला सोडवण्यासाठी त्यांनी मोर्चा काढल्याचीही चर्चा आहे. अशात काँग्रेसने बांदिवडेकरांना उमेदवारी दिल्याने ही उमेदवारी वादात सापडली.