Loksabha 2024 Baramati : बारामतीची निवडणूक सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरुद्ध सुप्रिया सुळे (Supriya Sule) अशी होत असली तरी खरा सामना अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असाच आहे. एरवी मतदानादिवशी शांत असणारं बारामती सोमवारपासून मात्र या ना त्या कारणामुळे चर्चेत येताना दिसलं. कधी पैसे वाटप, कधी कार्यकर्त्यांना मारहाण तर कधी आरोप. सर्वात आधी रोहित पवारांनी भोरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप केला.. अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्ते दिसत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. यासाठीच Y दर्जाची सुरक्षा पाहिजे होती का असा सवालही रोहित पवारांनी विचारला. आपल्या ट्विटरवरुन काही व्हिडीओ रोहित पवारांनी ट्विट केले.
रोहित पवारांचे आरोप
त्यानंतर रोहित पवारांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंचा एक व्हिडीओ ट्विट केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला भरणे दमदाटी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. भरणेंचा व्हिडीओ समोर येताच सुप्रिया सुळेंनी स्वत: तक्रार दाखल केली. तर भरणेंनी ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली त्याची भेटही सुप्रिया सुळेंनी घेतली. त्यानंतर पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आणखी एक व्हिडीओ रोहित पवारांनी ट्विट केला. माजी सरपंच विद्यमान सरपंचाच्या मुलाला पैसे देतानाचा व्हिडीओ काटेवाडीतला असल्याचा दावा रोहित पवारांनी केला.
रोहित पवारांना अटक करण्याची मागणी
तर रोहित पवारांना अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून करण्यात आली. रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात रडीचा डाव सुरु केलाय. रोहित पवारांनी किती गुंड राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी सोडले आहेत, याची चौकशी निवडणूक आयोग आणि गृहखात्याने करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी केलीय.राष्ट्रवादीकडून पैसे वाटत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्याप्रकरणी अटक करून चौकशी करा अशी मागणी सूरज चव्हाणांनी केलीय.
बारामती म्हटलं की शरद पवार अर्थात राष्ट्रवादीला एकगठ्ठा मतदान असंच चित्र अनेक वर्ष पाहायला मिळत होतं. मात्र राष्ट्रवादीत फूट पडली अन् हे चित्र पालटलं. मतदानादिवशी इतकी वर्ष शांत असणाऱ्या बारामतीत यंदा मात्र घमासान पाहायला मिळालं. विशेष म्हणजे पवार कुटुंबातच हे राजकीय महाभारत पाहायला मिळालं. आता या महाभारताचा फायदा कुणाला, तोटा कुणाला झाला, बारामतीकरांचा कौल कुणाला हे 4 जूनला समजेलच.