Aditya Thackeray On Raj Thackeray MNS Joining Mahayuti: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये सहभागी करुन घेतलं जाईल अशी चर्चा जोर धरत आहे. स्वत: राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे काही दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांना भेटून आले. या भेटी-गाठीनंतर राज्यातील महायुतीचे नेते आणि मनसेच्या नेत्यांच्या बैठकी झाल्या. मात्र त्यानंतर मनसेला महायुतीमध्ये समावून घेण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. ना मनसेकडून ना भाजपाकडून यासंदर्भात स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही. अशातच आता आमदार आदित्य ठाकरेंनी मनसेच्या महायुतीमधील सहभागासंदर्भात सूचक विधान केलं आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंना, मनसेची भूमिका स्पष्ट झालेली नाही. मनसे किती जागा लढणार वगैरे, असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. यावर आदित्य ठाकरेंनी, "यावर मी जास्त बोलत नाही पण एक आहे उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या, तिसऱ्या फेजनंतर कदाचित त्यांना सोबत घेतलं जाईल अशी भाजपाकडूनच आम्हाला चर्चा ऐकू येऊ लागली आहे," असं उत्तर दिलं.
दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला महायुतीसोबत घेण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही असं पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. "बैठका झाल्या आहेत याबद्दल कोणतेही दुमत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातात. त्यावर चर्चा होते. अद्याप त्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही," असं फडणवीस म्हणाले होते.
नक्की वाचा >> उमेदवार बदला! भाजपाचा शिंदेंवर दबाव; 8 पैकी 'या' 2 जागांवर उमेदवार बदलणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाने जाहीर केलेल्या 8 उमेदवारांपैकी 2 उमेदवार बदलावे लागण्याची चर्चा सुरु असून यावरुनही आदित्य ठाकरेंनी टोला लगावला आहे. "मिंधे गँगमध्ये पाच-सहा उमेदवार बदलत आहेत. म्हणजे गद्दारांनी विचार केला पाहिजे की त्यांचं भवितव्य काय असेल याचा विचार केला पाहिजे. लोकांनी ठरवलं आहे की इंडिया आघाडीमागे आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहायचं आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.
नक्की वाचा >> 'माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, तुम्हाला विचारल्याशिवाय..'; जानकरांचं जाहीर भाषणात विधान
उन्मेश पाटील आज संजय राऊतांची भेट घेत आहेत. महायुतीमध्ये फाटाफुटी सुरु आहे असं वाटतं का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. "आपण पुढे असा वेगवेगळ्या गोष्टी ऐकत जाल. चांगले आणि प्रमाणिक लोक महाविकास आघाडीत आहोत. देशहित आणि महाराष्ट्रहिताचा आम्ही विचार करतोय आणि तशीच आमची वाटचाल सुरु आहे. कुठेही आम्ही स्वार्थ पाहत नाही. जे स्वार्थी लोक होते ते एनडीएमध्ये गेले आहेत," असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.