Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Constituency) यंदा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात (Supriya Sule) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar))निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंच्या विकास कामाचा रथ आधीपासूनच मतदारसंघात फिरतोय. मात्र, आता बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ फिरू लागलाय. सूनेत्रा पवार खासदारकी लढवणार असल्याची चर्चा आहे. आणि मोदी की गॅरंटीच्या धर्तीवर अजित पवारांनी बारामतीकरांना गॅरंटी देत सूचक संकेतही दिलेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडून गेलेल्या खासदारापेक्षा नवा खासदार जास्त काम करेल. हा अजित पवारांचा (Ajit Pawar) शब्द आहे, हे जनतेला सांगा, अशी सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली. बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकलंय.. आणि पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट हल्लाबोल केलाय. पक्ष चोरला काय म्हणता...मी जर वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष झालोच असतो अशा शब्दात अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. तसंच माझा परिवार सोडला तर संपूर्ण पवार कुटुबीय माझ्याविरोधात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. मात्र आपण संपूर्ण ताकदीनं लढणार असा निर्धारही त्यांनी बारामतीच्या मेळाव्यात व्यक्त केला.
तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर घेतलेल्या बारामतीतल्या पहिल्याच सभेत लोकसभेचा प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. लोकसभेत आम्हाला आणि विधानसभेत त्यांना मत द्या असं आवाहन बारामतीकरांना केलं जाणार. मात्र मी राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे दोन्ही निवडणुका माझ्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत असं अजितदादांनी स्पष्ट केलंय.
बारामतीत कुल हे पवार कुटुंबियांचं पारंपरिक शत्रुत्व असलेलं कुटुंब. मात्र अजित पवारांनी पारंपरिक राजकीय शत्रूंसोबतही मोट बांधायला सुरुवात केलीय. त्यासाठी सूनेत्रा पवारांनी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली होती. 2019 मध्ये सुप्रिया सुळेंनी कांचन कूल यांचा 1,55,774 मतांनी पराभव केला होता. त्यात बारामती विधानसभा मतदारसंघातलाच लीड 1 लाख 27 हजारांचा होता.
अर्थात हे मताधिक्य मिळालं ते अजित पवारांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतल्यामुळेच. सुळेंना इंदापूर, पुरंदर आणि भोरमधून काहीशी आघाडी मिळाली. मात्र बारामतीने एकतर्फी दिलेलं मताधिक्य त्यांना विजयापर्यंत घेऊन गेलं.
बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर, खडकवासला, बारामती, इंदापूर, दौंड, भोर वेल्हा असे विधानसभा मतदारसंघ येतात. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, काँग्रेसचे 2 तर भाजपचे 2 आमदार आहेत... खडकवासला आणि दौंड मतदारसंघ भाजपकडे आहे. बारामतीतून अजित पवार तर इंदापूरमधून दत्तात्रय भरणे आमदार आहेत. भोर आणि पुरंदर काँग्रेसकडे आहे.
अजित पवार आता सरकारमध्ये सहभागी झालेत.. त्यामुळे खडकवासला, दौंड, बारामती आणि इंदापूरमध्ये अजित पवार गटाचा दबदबा आहे. तर सुनेत्रा पवारही बारामतीत सक्रीय झाल्या आहेत. सुनेत्रा पवार सक्रीय राजकारणात कोणतंही पद भुषवत नाहीत. मात्र बारामती मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. बारामतीत घरांघरातून कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचा वावर असतो..
दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी बारामती विधानसभा मतदारसंघात आपला स्वत:चा गट बांधला नाही. दादामुळे मला चिंता नसल्याचं सुळे वारंवार सांगायच्या. मात्र आता दादांनीच ताईंविरोधात रणशिंग फुंकलंय. आणि आता तर सुनेत्रा पवारच बारामतीमधून लोकसभा लढवण्याचे संकेत मिळतायत. तेव्हा खुद्द अजित पवार बाह्या सरसावून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. बारामतीची लढाई पवार विरुद्ध पवार अशीच रंगणार असल्याची शक्यता आहे. नणंद आणि भावजयीच्या लढाईत आता बारामतीकर कुणाला साथ देतात हे निकालानंतरच कळेल.