Devendra Fadnavis on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सहभागी झाले तेव्हा भाजपाचा पारंपारिक मतदार नाराज झाला होता. पण नंतर त्यांचं मत बदललं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivs) यांनी केला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी मराठी आणि मुस्लीम मतांचा मुंबईच्या जागांवर किती प्रभाव होऊ शकतो यावरही भाष्य केलं. मराठी आणि मुस्लीम मतं मुंबईतील सहा जागांवर गेमचेंजर ठरु शकतात असं ते म्हणाले आहेत.
अजित पवारांची राष्ट्रवादी जेव्हा भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीत सहभागी झाली तेव्हा भाजपा समर्थक नाराज झाले होते असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच शिवसेनेसह झालेली युती भावनिक असून, राष्ट्रवादीसह झालेली युती राजकीय असल्याचंही ते म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, "अजित पवार महायुतीत आले तेव्हा आमचा मतदार नाराज झाला. मात्र अजित पवारांच्या वर्तनाने महायुतीचा अवमान होणार नाही याची त्यांना खात्री पटली. तुम्हाला बारामतीच्या निकालात याचा प्रत्यय येईल. खडकवासला येथील भाजपाचे मतदार कोणाला मतदान करतात यावरुन तुम्हाला समजेल".
शरद पवारांच्या मूळ राष्ट्रवादीचा विचार केला तर त्यांची कोणतीही विचारधारा नाही. आम्हाला त्यांच्या विचारसरणीशी काही हरकत नाही, आम्हाला तुष्टीकरणाची समस्या आहे. जिथे साधनसंपत्तीवर हक्क मुस्लिमांचा आहे असं म्हटलं जातं. आमच्या म्हणण्यानुसार, जात-धर्माचा विचार न करता पहिला हक्क गरिबांचा आहे.
ठाणे मतदारसंघ न मिळाल्याने भाजपा समर्थक नाराज असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "कोणत्याही पक्षाला आपल्याला जास्त जागा मिळाव्यात असं वाटणं साहजिक आहे. आम्हाला 30 जागांची अपेक्षा होती, पण 28 मिळाल्या. आम्ही ठाणे मिळण्यासाठी आग्रही होतो. पण मुख्यमंत्री म्हणाले की, ही जागा आम्ही सातवेळा जिंकली आहे. जर मी आनंद दिघेंचा मतदारसंघ जाऊ दिला तर माझ्या समर्थकांचं खच्चीकरण होईल. आम्ही ठाण्यासाठी आग्रह करु नये अशी त्यांनी विनंती केली".
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भावनिक साथ मिळत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "काही उमेदवारांसाठी भावनिक लाट असेल, पण पूर्णपणे नाही. शरद पवारांनी पक्ष आणि घरं फोडली आहेत. आपला वारसा आपल्या मुलांकडे देण्याची इच्छा असल्यानेच त्यांचे पक्ष फुटले. दुसऱ्याला व्हिलन करुन कोणी हिरो होत नाही. शरद पवारांनी सुप्रिया सुळेंकडे वारसा सोपवायचा असल्याने अजित पवारांना व्हिलन करण्यात आलं. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षवाढीसाठी काम केलेलं असतानाही त्यांचे पंख छाटून आदित्य ठाकरेंना पुढे आणलं जात होतं". मराठी मतदार शिवसेनेसह आहे ही फक्त अफवा आहे असंही ते म्हणाले आहेत.