महादेव बेटिंग अॅपची (Mahadev Betting App) पाळंमुळं पुण्यापर्यंत पोहोचली आहेत. महादेव बेटिंग अॅप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी नारायणगाव येथे छापेमारी केली असून 70 ते 80 जणांना ताब्यात घेतलं आहे. नारायणगाव येथील एका इमारतीत अॅपचं काम सुरु होतं. धक्कादायक म्हणजे संपूर्ण इमारत महादेव अॅपसाठी वापरली जात होती.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी सध्या मोठी कारवाई सुरु आहे. या प्रकरणाची पाळमुळं परदेशापासून ते बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. त्यातच आता पुण्याचं कनेक्शनही समोर आलं आहे. नारायणगाव शहरातील एका इमारतीत याचं काम सुरु होतं. संपूर्ण इमारत महादेव अँपसाठी वापरत असल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसरा, 70 ते 80 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तपास सुरु आहे.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात (Mahadev Betting App Case) 28 एप्रिलला बॉलिवूड अभिनेता साहिल खानला (Sahil Khan) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. मुंबई पोलीस सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केली आहे. साहिल खान द लाय बूक अॅपशी जोडलेला होता, जे एक सट्टेबाजी अॅप असून महादेव बेटिंगच्या नेटवर्कचा भाग आहे. छत्तीसगढ येथे त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर साहिल खान मुंबई सोडून फरार झाला होता. विशेष तपास पथकाने 40 तासांच्या दीर्घ ऑपरेशननंतर त्याला अटक केली. यासाठी त्यांनी छत्तीसगड पोलिसांची मदत घेतली.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात अनेक अभिनेत्यांची नावं समोर आली असून, आता यात साहिल खानचाही समावेश झाला आहे. साहिल खान लोट बुक 24/7 नावाच्या एका सट्टेबाजी अॅप वेबसाईटमध्ये भागीदार आहे, जे महादेव बेटिंग अॅप नेटवर्कचा भाग आहे. साहिल खानवर लायन बूकला प्रमोट करण्याचा आणि त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावल्याचा आरोप आहे. लायन बूकला प्रमोट केल्यानंतर त्याने भागीदार म्हणून लोटस बूक 24/7 अॅप लाँच केलं होतं. साहिल अॅपच्या प्रमोशनसाठी आपल्या प्रसिद्धीचा वापर करत होता. तो सेलिब्रिटीजला आमंत्रित करुन ग्रँड पार्टी करायचा.
विशेष तपास छत्तीसगडमधील काही आर्थिक आणि रिअल इस्टेट कंपन्या आणि वादग्रस्त महादेव बेटिंग ॲपचे प्रवर्तक यांच्यातील कथित बेकायदेशीर व्यवहारांची चौकशी करत आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला महादेव बेटिंग अॅपच्या उपकंपनीचं प्रमोशन केल्याप्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स बजावण्यात आलं आहे. साक्षीदार म्हणून तिचा जबाब नोंदवला जाणार आहे.