मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : देशात प्रभू रामचंद्राच्या आणि कृष्णाच्या अस्तित्वाचा इतिहास जिथे जिथे सांगितला जातो त्या त्या भागात रामायण आणि कृष्ण सर्कीट उभारलं जाणार आहे. रामायण सर्कीटमध्ये अयोध्या, चित्रकूट, महेंद्रगिरीपासून रामेश्वरपर्यंतच्या ठिकाणांचा समावेश केला आहे.
राज्यातल्या नागपूर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचाही यात समावेश आहे. नाशिकच्या पंचवटीमध्ये रामचंद्राचं वास्तव्य होतं असं अख्यायिकेत सांगितलं जातं. या सर्व ठिकाणांचा केंद्र सरकार विकास करणार आहे. नाशिकमधील रामकुंड, पंचवटी, तपोवन, सीतागुंफा, रामशेज किल्ला, सर्वतीर्थ टाकेद या परिसराचा विकास केला जाणार आहे. यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल. या योजनेच्या माध्यमातून गोदाकाठच्या मंदिरांचं रूपडं पालटणार आहे. तपोवनात जिथे शूर्पणखेचं नाक कापलं ती जागा, हनुमान जन्म ज्या अंजनेरी पर्वतावर झाला ते ठिकाण यांचाही विकास होणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातला रामसेतू हा मानवनिर्मित असल्याचे दाखले नुकतेच अमेरिकतेल्या एका अभ्यासगटाने दिले. त्यामुळे रामायण सर्कीटच्या कार्यक्रमाला चालना मिळण्याची शक्यता आहे. बैठकांचा सिलसीला सुरू झालाय. आता अंमलबजावणी कधी होते याची उत्सुकता आहे.