Maharashtra Assembly Election 2024 Sangli Tasgaon: सांगलीमधील तासगाव मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होणार आहे. या ठिकाणी शरद पवारांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर अजित पवारांनी संजय पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना थेट एबी फॉर्म देत रोहित पाटलांविरोधात उभं केलं आहे. आज तासगावमध्ये झालेल्या सभेत संजय पाटलांनी थेट आर. आर. पाटील यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबियांवर शेलक्या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं. आर. आर. पाटील यांनी पोलीस खात्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याच्या आरोपांबरोबर रोहित पाटील यांना संजय पाटील यांनी, 'लै लहान आहेस,' असं म्हणत टीका केली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत रोहित पवारांवर साधला निशाणा.
संजय पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेमधील भाषणात त्यांनी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबावर निशाणा साधला. "तालुक्यात 35 वर्ष तरुण जीवनाशी खेळण्याचे काम आर आर पाटील कुटुंब करत आहेत. राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री केले. त्यांना तालुक्याचा विकास काम करण्याचे सांगितले पण केवळ टीव्हीवर दिसण्याचं काम आर आर आबांनी केले," अशी टीका संजयकाका पाटील यांनी आपल्या भाषणातून केली. "बारामतीकरांनी आर. आर. आबांना दोनदा जीवदान दिले," असंही संजय पाटील यांनी म्हटलं.
तसेच गुंडगिरीवरुन केल्या जाणाऱ्या टीकेलाही संजय पाटील यांनी उत्तर दिलं. "संजय पाटील गुंडगिरी करतात असं म्हणता. दादा, तुम्ही आर. आर. पाटील यांना गृहमंत्री केले. यातून त्यांनी पोलीस वापरून कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचे काम केले. त्याला प्रतिकार केला म्हणून गुंडगिरी म्हणता," अशी टीका करताना माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना संजय पाटलांनी लक्ष्य केलं. "लोकसभेला पराभव झाला. कारण त्यावेळी जाती-जाती धर्माचे राजकारण झाले. कुरघुडीचे राजकारण केले," असंही संजय पाटील म्हणाले.
नक्की वाचा >> अर्ज भरतानाच सरवणकरांचा मास्टर स्ट्रोक! आता स्वत: CM शिंदे, राजही काही करु शकत नाहीत; कारण...
"पाणी योजनेसाठी रोहित पाटलांनी उपोषण केले पण 1 दिवसात त्याची पेंग्विनसारखी अवस्था झाली. मात्र 60 वर्षाचा शेलार मामा संजयकाका 9 दिवस उपोषण बसला होता. अरे बाळा, लै लहान आहेस! आम्हला मर्यादा सोडायची नाही हे माहीत आहे, पण कमरेखाली वार करू नको," असा इशारा संजय पाटलांनी रोहित पाटील यांना दिला आहे.
"गेलेल्या माणसाविषय वाईट बोलायचे नाही. मात्र अजितदादांनी मला बोलवून सुमनताई पाटलांना मदत करायचे सांगितले होते. आबा गेल्यानंतर मी आबांच्या कुटुंबाला त्रास द्यायला गेलो नाही. मात्र माझे नारडं दाबायाचे वेळी आली तेव्हा पहिल्यांदा अंजनीचे घर आले," अशी घणाघाती टीका संजय पाटलांनी रोहित पाटलांच्या कुटुंबावर केली.
नक्की वाचा >> शिंदेंबरोबरच्या Adjustment मुळे BJP हक्काचा मतदारसंघ गमावणार? बड्या नेत्याची बंडखोरी; 3 मतदारसंघात फटका
"रोहित पाटील हे कॅमेराजीवी माणूस आहे. रोहित पाटलांना आव्हानं देतो. कोणते ठिकाण, स्टेज सांगा मी यायला तयार आहे. तुम्ही 35 वर्षाचा आणि मी माझ्या 10 वर्षाच्या कारकीर्दचा हिशोब मांडतो," असंही भाषणाच्या शेवटी संजय पाटलांनी म्हटलं आहे.