बारामतीच्या निवडणुकीत ट्विस्टः 'शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवणारा' शेलिब्रिटी मैदानात

Baramati Vidhansabha:  शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवतो, असे म्हणणारा शेलिब्रिटी निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकून उभा राहिला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Oct 29, 2024, 03:37 PM IST
बारामतीच्या निवडणुकीत ट्विस्टः 'शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवणारा' शेलिब्रिटी मैदानात title=
अभिजीत बिचुकले

Baramati Vidhansabha: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहे. यासाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत बारामती विधानसभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारण येथे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी चुरशीची लढत होणार आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. दोघांसाठीही ही लढत प्रतिष्ठेची आहे. हे असताना बारामतीच्या निवडणुकीत ट्विस्ट आलाय. शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवतो, असे म्हणणारा शेलिब्रिटी निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकून उभा राहिला आहे. त्यामुळे बारामतीच्या लढतीची वेगळीच चर्चा पाहायला मिळणार आहे. 

बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युगेंद्र पवार यांनी अर्ज भरला. ते अजित पवार यांच्याविरोधात लढणार आहेत. आता यात अभिजीत बिचकुले यांनी बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पवार विरुद्ध पवार लढाईमध्ये अभिजीत बिचकुले यांनी उडी घेतलीय.
अनेक निवडणुका लढवल्यानंतर अभिजीत बिचकुले आता बारामतीतून आपले नशीब आजमवणार आहेत.

कसब्याची पोट निवडणूक

अभिजीत बिचुकले यांनी कसब्याची पोट निवडणुक लढवली होती. त्यावेळी धंगेकर किती मतांनी आघाडीवर आणि बिचुकले किती मतांनी पिछाडीवर या दोनच चर्चा सगळीकडे सुरु होत्या. अभिजीत बिचुकलेंना किती मतं मिळाली? असा प्रश्न विचारणारेही अनेकजण होते. कसबा पोट निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंना तब्बल 47 मते मिळाली होती.  तरीही त्यांच्या आत्मविश्वासात कसुभरही कमतरता आली नाही. 

कल्याण मतदारसंघ

अभिजीत बिचकूले यांना कल्याण मतदार संघातून 1808 मत मिळाली होती. बिचुकले यांनी या व्यतिरिक्त साताऱ्यातून देखील निवडणूकीचा अर्ज भरला होता. तिथून त्यांना 1395 मत मिळाली होती. साताऱ्यातून उदयनराजे भोसले विजयी ठरले होते. अभिजीत बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुक लढवल्या आहेत. अभिजीतनं सोशल मीडियावर आजवर त्यांनी अनेक स्टंट केले आहेत. ते नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहतात. आजवर अनेक निवडणूक लढवल्या असल्या तरी अभिजीत बिचुकले याला आजवर यश मिळालेलं नाही. 

आता डॉक्टर बिचुकले 

अभिजीत बिचुकले हे आता आपल्या नावापुढे डाँक्टर उपाधी लावतात. यामागच कारणही तसंच आहेत. आपल्याला डॉक्टरेट मिळाल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ मॅजिक अँड आर्ट्स या विद्यापीठाची मानद डॉक्टरेट देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.