Maharashtra Weather News : ऑक्टोबर महिना संपून आता नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे. वर्ष संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाच राज्यात हिवाळा नेमका कधी सुरू होणार याचीच अनेकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. सद्यस्थितीला राज्याच्या काही भागांवर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळत आहे, तर काही भागांमध्ये मात्र सूर्यदेवाचा प्रकोप सुरू आहे.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये थंडीची कोणतीही चिन्हं नाहीत. उलटपक्षी दुपारच्या वेळी दिवस डोक्यावर येत असताना तापमानाच लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये परिस्थिती वेगळी नाही. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भासह मराठवाड्यातही हेच चित्र आहे.
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र पहाटेच्या वेळी हलका गारठा जाणवू लागला आहे. पण, त्यानंतर मात्र उष्णतेचा दाह आणखी तापदायक करत आहे. पुढील 24 तासांमध्ये हवामानातील स्थितीमध्ये फारसे बदल पाहायला मिळणार नाहीत असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यातील कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 28 ते 26 अंशांदरम्यान राहील अशीही शक्यता आहे.
देशभरात पुढील 24 तासांमध्ये अंदमान निकोबार द्वीपसमुहात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडेही पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग इथंही पावसाची हजेरी असेल. अद्यापही देशाच्या उत्तरेडील राज्यांमध्ये हिमालयातून येणाऱ्या शीतलहरींनी हजेरी लावली नसल्यामुळं यंदा देशात आणि महाराष्ट्रातही थंडीची सुरुवात काहीशी उशिरानं होण्याचा अंदाज आहे.