SSC HSC Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी केल्यास थेट फौजदारी गुन्हाच दाखल केला जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे. मात्र या निर्णयाला विद्यार्थी संघटनांसह, शिक्षक संघटनेनेही विरोध केल्याने शिक्षण मंडळाचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. आजपासून बारावीची परिक्षा सुरू झाली. याकरिता शिक्षण मंडळाने नेहमीप्रमाणे कॉपीमुक्त अभियान हाती घेतलंय. पोलीस बंदोबस्त, भरारी पथके त्यासाठी नेमली आहेत. सीसीटीव्हीच्या नजरेखाली या परीक्षा होत आहेत. विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर समुपदेशक नेमण्यात आले आहेत. त्यांची मदत विद्यार्थ्यांना घेता येतेय. अशानेी कॉपी करणे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना महागात पडेल, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जर विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले आहे, त्यामुळे कॉपी करताना विद्यार्थी पकडल्या गेल्यास त्यांच्या भवितव्यावर हा निर्णय गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो, असे बोर्डाकडून सांगण्यात आलंय.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय रद्द करा अन्यथा त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने व्यक्त केली आहे. चुकीच्या गोष्टीला शिक्षा मिळणे गरजेचे असते. परंतु ती चुक सुधारण्याची संधी न देता अशा प्रकारे भवितव्य अंधारात घालण्याचा आदेश हा निश्वितच अन्याय कारक आहे. असे मनसे ने म्हटले आहे.
शिक्षक भारतीनेही या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.आजवरच्या वर्षात किती फौजदारी कारवाया केल्या असा सवाल शिक्षक भारतीने उपस्थित केला, कारवाई करायची तर ज्या केंद्रावर सर्रास कॉपी चालते त्यांच्यावर करा मात्र विद्यार्थ्यांमध्ये ऐन परीक्षेच्या तोंडावर भीती पसरवू नका, त्यांना निर्भय वातावरणात परीक्षेला सामोरे जाऊ द्या, कॉपी साठी शिक्षण मंडळाची यंत्रणा दोषी राहू शकते, मात्र यंत्रणेचा दोष विद्यार्थ्यांच्या मस्तकी मारू नका असा ईशारा शिक्षक भारतीने दिला आहे.
दरवर्षी राज्यातील अनेक शाळांमध्ये कॉपी बहाद्दरांची झुंबड दिसते, अनेक केंद्रांवर सामुहीक कॉपीचेही प्रकार उघडकीस येतात. त्यामुळे निश्चितच अभ्यासू विद्यार्थ्यांवर परिणाम होतो म्हणून कॉपीमुक्त वातावरण गरजेचे आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश योग्य की अयोग्य यावरून वाद निर्माण झाल्याने शिक्षण मंडळ काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.