Success Story: फक्त 12 हजाराची गुंतवणूक, वरुन 90 टक्के सब्सिडी; डोकं लावून शेतकरी 'असा' बनला मालामाल!

Farmers Success Story:  योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कठोर परिश्रमाने शेती फायदेशीर आहे हे शेतकरी दाखवून देत आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Feb 11, 2025, 03:51 PM IST
Success Story: फक्त 12 हजाराची गुंतवणूक, वरुन 90 टक्के सब्सिडी; डोकं लावून शेतकरी 'असा' बनला मालामाल! title=
सक्सेस स्टोरी

Farmers Success Story: व्यवसाय करायच म्हटलं की गुंतवणुकीसाठी भांडवल नाही, जागा नाही, अशी तक्रार बोलून दाखवतात. पण खूप कमी भांडवलातदेखील तुम्ही चांगला नफा कमावू शकता, हे एका शेतकऱ्याने दाखवून दिलंय. त्याने शेतीला कमाईचं साधन बनवलंय. या शेतीसाठी फार मोठ्या जागेची गरज लागत नाही, तर घराचा कोपराही पुरेसा आहे. कोणती आहे ही शेती? याचा उपयोग करुन शेतकरी कसे कमाई करतायत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

मशरूम उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देत आहे. राज्यांमध्ये प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी मशरूम किट अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू लागली आहे. सजग शेतकरी सरकारकडून देण्यात येणाऱ्या या संधीचा फायदा घेत आहेत. बिहारमधील शेतकरी अवधेश मेहता यांनी शेतीतून उत्पन्नाचा एक नवीन मार्ग शोधला आहे. 

मशरुमचे उत्पादन घेऊन लोक चांगले नफा मिळवून आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहेत. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कठोर परिश्रमाने शेती फायदेशीर आहे हे शेतकरी दाखवून देत आहेत. हेच ओळखून अवधेश मेहता यांनी मशरुमची शेती करण्यासाठी पारंपारिक शेती सोडली. 

12 हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात 

शेतकरी अवधेश मेहता यांनी 12 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून मशरूम उत्पादन सुरू केले. सुरुवातीला त्यांनी 200 पिशव्या तयार केल्या. ज्याची किंमत प्रति बॅग 60 रुपये होती. एका बॅगमधून 1 ते 1.5 किलो मशरूम मिळू लागले. सध्या बाजारात मशरूम 250 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत. 200 बॅगांमधून त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत कमाई होऊ लागली आहे. कमी खर्चात जास्त नफ्याचे हे मॉडेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतंय. 

कमी जागेत आणि कमी खर्चात

शेतकरी अवधेश यांच्या यशातून प्रेरणा घेऊन आणखी 15 शेतकऱ्यांनीही मशरूम उत्पादन सुरू केले आहे. पारंपारिक शेतीच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन कमी जागेत आणि कमी खर्चात करता येते. या कारणामुळे शेतकऱ्यांसाठी मशरूम उत्पादन हा एक चांगला पर्याय बनत आहे.

25-30 दिवसांत मशरूम काढणीसाठी तयार

मशरूम उत्पादन ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. हे शिकून कोणताही शेतकरी हा व्यवसाय सुरू करू शकतो. मशरूम लागवडीसाठी थंड आणि ओलसर जागा आवश्यक असते. बियाणे पेंढा किंवा गव्हाच्या सालात मिसळून पिशव्या तयार केल्या जातात. हे पिकं घेण्यासाठी 20-25 अंश सेल्सिअस आणि 80-85% आर्द्रता आवश्यक आहे. 25-30 दिवसांत मशरूम काढणीसाठी तयार होतात. यानंतर ते बाजारात विकले जाते. मशरुम हे कमीत कमी जोखमीसह अधिक नफा देणारे पिकं आहे. पारंपारिक पिकांच्या तुलनेत कमी वेळेत जास्त नफा देणारा हा चांगला व्यवसाय आहे. असे असले तरी अवधेश यांनी पारंपारिक शेती सोडली नाही. अवधेश हे मशरूमसोबत मत्स्यपालन देखील करत आहे.

मशरूम किटवर 90% अनुदान

लाभार्थी शेतकऱ्यांना मशरूम किटवर 90% अनुदान दिले जात आहे. मशरूम लागवडीसाठी शेत जमिनीची आवश्यकता नसते. तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही खोलीत मशरूमची लागवड करू शकता. मशरूम किट वितरण योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी एकूण 55 रुपयांच्या किमतीवर 90 टक्के अनुदानावर मशरूम किट मिळवू शकतात, अशी माहिती बिहार कृषी विभागाने दिली आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना मशरूम किटवर फक्त 5 ते 6 रुपये खर्च करावे लागतील. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान 25 कीट आणि जास्तीत जास्त 100 मशरूम किट दिले जातील, असेही बिहार कृषी विभागाने म्हटलंय.