Nation Wide Blackout: एखाद्याने व्यक्तीने विक्षिप्त चाळे केले तर त्याला माकडचाळे असं म्हटलं जातं. हौदोस घालणाऱ्या माकडांवरुन हा शब्द आला असून अनेकदा माकडांनी घातलेल्या अशा गोंधळाच्या बातम्या समोर येत असतात. मात्र एका विचित्र घटनेमध्ये माकडाच्या वेडेपणामुळे संपूर्ण देश अंधारात गेल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील माहिती या देशातील सरकारी अधिकाऱ्यांनीच दिली आहे.
एका इलेक्ट्रीक ग्रीड सब स्टेशनमध्ये माकडाने ट्रान्सफॉर्मरला स्पष्ट केल्याने रविवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार 11 वाजून 30 मिनिटांनी (भारतातील वेळेनुसार सकाळी 11 वाजता) हा प्रकार घडला. हा सारा प्रकार भारताच्या शेजारी असलेल्या श्रीलंकेत घडला. सकाळी साडेअकरा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा थेट सायंकाळी सुरळीत झाला.
ऊर्जामंत्री कुमारा जयाकोडे यांनी घडलेल्या घटनेबद्दलची माहिती दिली. "एक माकड सब स्टेशनमधील ग्रीड ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आलं. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला," असं कुमारा जयाकोडे म्हणाले. दक्षिण कोलंबोमधील उपनगरातील सबस्टेशनमध्ये हा सारा प्रकार घडला. हा प्रकार घडल्यानंतर काही तासांमध्ये टप्प्याटप्प्यात वेगवेगळ्या भागांचा वीजपुरवठा सुरु झाला. जवळपास सहा तासांहून अधिक काळ हा गोंधळ सुरु राहिला.
असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, "इंजिनिअर्सला घटनास्थळावर पाठवण्यात आलं आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आमचे प्रयत्न सुरु आहेत," असं श्रीलंकेच्या ऊर्जामंत्र्यांनी घडलेल्या प्रकारावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना सांगितलं होतं. यापूर्वी श्रीलंकेमध्ये 2022 साली ऐन ऊन्हाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात वीजपुरवठ्यासंदर्भातील समस्येला तोंड द्यावं लागलं होतं. या कालावधीमध्ये तिथे आर्थिक मंदी असल्याने पुरेशी वीजनिर्मिती केली जात नसल्याने लोकांना लोडशेडींगचा सामना करावा लागला होता. या माकड प्रकरणामुळे अनेकांना पुन्हा याच गोष्टीची आठवण झाली. या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा पुरवठा नसल्याने जनरेटर चालवण्याची शक्यता नव्हती. अनेक पेट्रोल पंपांबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा त्यावेळी लागल्या होत्या. अगदी घरात स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या गॅसचीही प्रचंड टंचाई त्या काळात होती.