SBI Investment Scheme : भारतात काही सरकारी बँकांनी खातेधारकांना केंद्रस्थानी ठेवत अनेक विश्वासार्ह योजना सुरु केल्या. खातेधारकांनीसुद्धा या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. केंद्राच्या अख्तयारित येणारी अशीच एक बँक म्हणजे एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँक.
सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून चर्चेत असणाऱ्या SBI नं नुकतीच ग्रीन रुपी टर्म डिपॉजिट योजना सुरु केली आहे. पर्यावरण संरक्षणाला वाव देण्यासाठी ही एक Fixed Deposite योजना असून, ग्रीन रुपी टर्म डिपॉजिट (SGRTD) असं या योजनेचं नाव. पर्यावरणपूरक योजनांसाठी आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी म्हणून याच योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या हेतूनं ही योजना सुरु करण्यात आली आहे.
कोणीही भारतीय नागरिक, एनआरआय (NRI) अर्थात अनिवासी भारतीय, एनआरओ (NRO) या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. तीन वेगवेगळ्या कार्यकाळांसाठी या योजनेत पैसे गुंतवता येणार असून, 1111 दिवस, 1777 दिवस आणि 2222 दिवस अशी या कालावधीची विभागणी घेण्यात आली आहे.
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर सुरुवातीला बँकेच्या शाखेकडून फायदा घेता येणार आहे. ज्यानंतर ही योजना एसबीआयच्या योनो (YONO) अॅपसह इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगमध्येही सुरु करण्यात येणार आहे. एफडीपेक्षा या योजनेमध्ये तुलनेनं कमी व्याज मिळणार असून, 1111 दिवसांवर 6.65 टक्के व्याज, 1777 दिवसांवर 6.65 टक्के व्याज आणि 2222 दिवसांवर 6.40 टक्के व्याज दिलं जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, एसबीआयचे कर्मचारी यांना या योजनेमध्ये वाढीव व्याज मिळणार असून, एनआरआय नागरिक आणि एनआरआय कर्मचारी मात्र त्यास पात्र नसतील. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना लोन आणि ओवरड्राफ्ट सुविधा उपलब्ध राहणार असून, आयकर नियमांनुसार इथं टीडीएसही लागू असेल. जिथं गुंतवणूकदारांना योजनेनुसार फॉर्म 15G किंवा 15H भरावा लागू शकतो.