Mumbai Crime: आधी पतीला दारु पाजली, नंतर चाकूने गळा कापून खारफुटीच्या झाडात फेकून दिलं; पण 'ती' एक चूक नडली

मालाडच्या मालवणीमध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. राठोडी परिसरात ही घटना घडली आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 11, 2025, 02:24 PM IST
Mumbai Crime: आधी पतीला दारु पाजली, नंतर चाकूने गळा कापून खारफुटीच्या झाडात फेकून दिलं; पण 'ती' एक चूक नडली title=

मालाडच्या मालवणीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची अत्यंत निर्घृण हत्या केली आहे. 3 फेब्रुवारीच्या रात्री घटना घडली आहे. पूजा असं या महिलेचं नाव असून, आरोपी प्रियकराचं नाव इम्रान मन्सूरी आहे. पूजा आणि इम्रानने मिळून राजेश चौहान यांची हत्या केली.  राठोडी परिसरात हा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे, महिलेने दोन मुलांसमोर पतीला ठार केलं. 

पीडित 30 वर्षीय राजेश रोजंदारीवर काम करत होता. पूजाने आपल्या दोन मुलांसमोर राजेशचा गळा कापून त्याची हत्या केली. यानंतर पूजा आणि मन्सूरने दुचाकीवरुन राजेशचा मृतदेह नेला आणि 500 मीटर अंतरावर एका निर्जनस्थळी फेकून दिला. आपल्यावर संशय येऊ नये यासाठी नंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पूजा आणि मन्सूरी यांच्या प्रेमसंबंध होते. यामुळे पूजाला आपला पती राजेशसोबत राहण्याची इच्छा नव्हती. 

पूजाला मन्सूरीसोबत आपले प्रेमसंबंध कायम ठेवायचे होते. धक्कादायक म्हणजे मन्सूरी आणि राजेश एकमेकांचे चांगले मित्र होते. पण नात्यात अडथळा ठरत असल्याने मन्सूर आणि पूजा या दोघांनी मिळून राजेशचा काटा काढण्याचा कट आखला. 

बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी एका सीसीटीव्हीत पूजा, मन्सूरी आणि राजेश एकत्र प्रवास करताना कैद केले. हे सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी पूजा आणि मन्सूरी यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. कसून चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. आपल्या प्रेमसंबंधांमुळे राजेशची हत्या केली असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. 

पूजाने पोलिसांना सांगितलं की, पतीला आमच्या नात्याची माहिती मिलाल्याने त्याला ठार केलं. शनिवारी रात्री आम्ही त्याला दारु पाजली. यानंतर मुलं रुममध्ये असताना किचनमधील चाकूच्या आधारे त्याची हत्या केली. यानंतर मृतदेह घेऊन दोघे दुचाकीवर बसले. यावेळी त्याचा गळा कापडाने लपवला होता. नंतर त्यांनी राठोडी परिसरातील खारफुटीच्या झाडांमध्ये मृतदेह फेकून दिला. 

पूजाने सांगितलं की, तीन महिन्यांपूर्वी पतीने मन्सूरीला आपल्या घरात राहण्यासाठी जागा दिली. त्याला राहण्यासाठी इतर कुठे जागा नसल्याने डोक्यावर छप्पर दिलं. मात्र काही दिवसातच पूजा आणि मन्सूरी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी राजेशच्या हत्येचा कट आखला. पूजा आणि मन्सूरीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. 9 फेब्रुवारीला दोघांना हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे.