Ravi Raja Joins BJP: काँग्रेसचे रवी राजा (Ravi Raja) यांनी पक्षाची साथ सोडून भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. गेल्या 44 वर्षं काँग्रेसमध्ये असणाऱ्या रवी राजा यांच्या पक्ष प्रवेशादरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार (Ashish Shelar) उपस्थितीत होते. दरम्यान रवी राणा यांनी यावेळी संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी असं विधान केलं की सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान माझ्या अनुभवाचा कधीच काँग्रेसने वापर करून घेतला नाही अशी खंत त्यांनी मांडली.
रवी राजा यांनी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचा उल्लेख केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना त्यांनी भावी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री असं म्हटलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'हे फक्त सेन्सॉर करुन टाका' असं सांगितलं. हे ऐकल्यानंतर एकच हशा पिकला.
रवी राजा हे सायनमधून पाचवेळा नगरसेवक राहिले आहेत. तर मागील पाच वर्षं मुंबई पालिकेत विरोधी पक्षनेतेही होते. गेली 44 वर्षं ते काँग्रेसमध्ये होते. मुंबई काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक पदं भुषवली. मुंबई महापालिकेच्या राजकारणात अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सायन परिसरात दक्षिण भारतीय समाजात त्यांची चांगली ताकद आगे. मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड वारंवार डावलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रवी राजा यांच्यासह उपाध्यक्ष अभिषेक सावंत, ठाकरे गटाचे घाटकोपरचे विभाग प्रमुख बाबू दरेकर यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांना उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे. रवी राजा यांची मुंबई उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. रवी राजा हे आमचे जुने मित्र आहेत. रवी राजा हे अभ्यासू नेतृत्व आहे. बीएसटीच्या बाबतीत तर यांचा अभ्यास दांडगा आहे असं आशिष शेलार यावेळी म्हणाले.
आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा यांच्यासारखा मातब्बर नेता आमच्यासोबत आला. 23 वर्ष त्यांनी बेस्टचे सदस्य म्हणून काम केलं. रवी राजा यांचा अनुभवाचा आम्हाला फायदा होईल असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. पुन्हा महायुतीचं सरकार येणार अशी भावना आता जनतेच्या मनात आहे. क्रॉस फॉर्म अनेक ठिकाणी भरण्यात आले आहेत. त्याबाबत काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास सगळ्या समस्या सोडवल्या आहेत. जे अर्ज मागे घ्यायचे आहेत ते आम्ही लवकरच मागे घेऊ. दिवाळीनंतर आम्ही जोरात प्रचार करू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. अमित ठाकरेंबद्दल विचारलं असता त्यांनी बोलणी सुरू आहे, मार्ग असा निघावा की आम्ही सगळे सोबत एकत्र राहू असं सांगितलं. नवाब मलिक यांच्याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका आशिष शेलार यांनी मांडली आह. त्यांची भूमिका अधिकृत आहे असंही मी सांगितलं आहे.. त्यामुळे त्यावर वारंवार चर्चा करणं योग्य नाही असं फडणवीस म्हणाले. आता आर आर पाटील हयात नाही सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.