Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena: महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन गोंधळ सुरु असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत गोंधळही दिसून येत आहे. मुंबईमधील अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या दहिसरमधून नेमकं निवडणूक लढवणार कोण यासंदर्भातील संभ्रम काय आहे. विशेष म्हणजे पक्षच या बाबतीत संभ्रमात असून तासाभराच्या फरकाने दोन वेगवेगळ्या पोस्टमध्ये एकाच मतदारसंघातून आधी सुनेला आणि नंतर सासऱ्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्याचं दिसत आहे.
काल दुपारी मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दहिसर विधानसभा निवडणुकीसाठी घोसाळकर कुटुंबियांकडे पक्षाचा एबी फॉर्म सोपवला. हा फॉर्म घेताना सर्वात पुढे तेजस्वी घोसाळकर फोटोमध्ये दिसत आहेत. याच फोटोत तेजस्वी यांचे सासरे विनोद घोसाळकरही दिसत आहेत. विशेष म्हणजे पक्षाच्या अधिकृत हॅण्डलवरुन आधी तेजस्वी घोसाळकरांना एबी फॉर्म देण्यात आल्याची पोस्ट एक्सवर करण्यात आली. मात्र त्यानंतर सव्वा तासाने विनोद घोसाळकर हे अधिकृत उमेदवार असतील अशी पोस्ट करत पुन्हा फोटो एबी फॉर्म वाटल्याचे फोटो शेअर करण्यात आले. आज म्हणजेच 27 ऑक्टोबरच्या 'सामना'मधूनही विनोद घोसाळकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळेच एबी फॉर्म सुनेला आणि उमेदवारी सासऱ्याला असा काहीसा घोळ झाल्याचं चित्र या संभ्रमामुळे दिसत आहे.
ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून विनोद घोसाळकर यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. असं असलं तरी अर्ज भरेपर्यंत काहीही होवू शकते असं म्हटलं जात आहे. खरं तर दहिसरमधून निडवणूक लढवण्यासाठी तेजस्वी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर हे दोघेही इच्छुक होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घोसाळकर कुटुंबाला पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला. घोसाळकर कुटुंबाने कोणी लढायचं यावर निर्णय घ्यावा असं उद्धव ठाकरे यांनी तेजस्वी आणि विनोद घोसाळकरांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती समोर येत आहे. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत ट्विटर वरून तसंच इन्स्टावरून तेजस्वी घोसाळकर यांना पक्ष प्रमुखांनी एबी फॉर्म दिला असं जाहीर करण्यात आलं होते. तशा बातम्याही प्रसारमाध्यमांनी चालवल्या. मात्र आज पक्षाच्या मुखपत्रातून विनोद घोसाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने उमेदवारीवरुन संभ्रम निर्माण झाला आहे.
नक्की वाचा >> पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मातोश्री'सह वरिष्ठ नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी तेसस्वी घोसाळकरांच्या नावाचा आग्रह धरल्याचे समजते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून विनोद घोसाळकर यांची समजूत काढण्याचाही प्रयत्नही करण्यात आला. मात्र त्यानंतरही विनोद घोसाळकर माघार घेण्यास तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. विनोद घोसाळकर हे माजी आमदार आहेत. ते ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि संभाजीनगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 2014 ला दहिसरमधून तर 2019 मध्ये श्रीवर्धनमधून त्यांचा पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. त्यामुळेच आता तरुण नेतृत्व असलेल्या तेजस्वी यांना उमेदवारी देण्याची मागणी होताना दिसतेय.