Pravin Darekar Interview: भाजप नेते प्रविण दरेकर यांनी नुकतीच 'झी 24 तास'च्या जाहीर सभा कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मनसे का सोडली? राज ठाकरेंशी कसं नातं होतं? फडणवीसांचे विश्वासू कसे बनले? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
उमेदीच्या काळात विद्यार्थी सेनेत काम करत होतो. बोरीवलीतल्या काजू पाड्यातून मला नगरसेवक पदाचे तिकीट मिळणार होते. पहिलीच निवडणूक आणि तिकीट मिळणार या आनंदात होतो. पण एक भीती होती. मला इतक्या सहज तिकीट मिळेल असं वाटत नव्हत. कारण मी राज ठाकरेंशी एकनिष्ठ होतो. राज ठाकरे मला बाळासाहेबांकडे घेऊन गेले. त्यांनी विचारल निवडून येशील ना? मी हो साहेब म्हणालो आणि तिथून निघालो. पण यापुढे राजकारणात क्षणाक्षणाला कसं महत्व असतं याची प्रचिती मला आली. 'बाळासाहेब म्हणाले, तिकडे सुभाष देसाई बसले आहेत, त्यांच्याकडून एबी फॉर्म घेऊन जा.' मी एबी फॉर्म घ्यायला जाणार इतक्यात राज ठाकरे म्हणाले, 'चल घरी जाऊ.' हे ऐकताच मी त्यांच्यासोबत गेलो. खुद्द बाळासाहेबांनी सांगितलंय. एबी फोनपण देणार आहेत. इतकं झालंय म्हणजे आपलं तिकीट कन्फर्म असं मी देखील समजत होतो. इतक्यात काजू पाड्यातून फोन येऊन उलटसुलट माझ्याबद्दल सांगण्यात आलं. तुमच्या गुणवत्तेपेक्षा तुम्ही कोणासोबत आहात हे राजकारणात पाहिलं जातं हे खूप दुर्देवी आहे. त्यामुळे काही लोक नेत्याभोवती फिरतात, दार उघडून देतात. पण हे चिरकाळ टिकत नाही. विधानसभेला नाव कोणी खोडलं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी याचे उत्तर जाहीरपणे देण्यास त्यांनी नकार दिला.
राज ठाकरेंना माझ्या क्षमतेची कदर होती. देवेंद्र फडणवीसांनी माझ्या क्षमतेची पारख केली. मला काय द्याल? हे मी त्यांना कधीच विचारल नाही. इकडे काम होतं नव्हतं. गती मिळत नव्हती, त्यामुळे नैराश्य आलं होतं. त्यावेळी फडणवीसांना मी फोन केला होता. तुझ्या क्षमतेची मला जाणिव आहे, असे ते म्हणाले. विधानपरीषदेची तयारी सुरु होती. त्यावेळी दानवेंचा मला फोन आला. त्यावेळी मला तिकीट मिळेल हे वाटू लागले. मला विधानपरिषद मिळाली. विरोधी पक्ष नेतेपद मागणे मला संयुक्तिक वाटत नव्हतं. पण फडणवीसांनी मला ती जबाबदारी दिल्याचे दरेकर म्हणाले. माझ्या आत्मविश्वासाचं कारण देवेंद्र फडणवीस आहे. मी विरोधी पक्षनेता असताना सरकारला झोडून काढत होतो. माझ्या बॅंकेचे प्रकरण झालं तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी रुद्रावतार घेतला आणि सगळ्यांना झोडून काढलं. मला अटक करायचा विरोधकांचा प्लान होता. पण फडणवीस मोठ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले, असे दरेकरांनी यावेळी सांगितले.
मनसे सोबत अजिबात बिनसलं नाही. कामांना गती मिळत नव्हती. उद्धव ठाकरेंच्या पक्षात गेलो असतो तर मला पदही मिळालं असतं. पण मी तिकडे गेलो नाही, असे उत्तर दरेकरांनी सांगितले.