महाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

Maharashtra Irrigation Scam Ajit Pawar : अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी केलीये.. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनीही आक्रमक प्रतिक्रिया देत अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय..

वनिता कांबळे | Updated: Oct 29, 2024, 09:58 PM IST
 महाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासा title=

Maharashtra Assembly Elections 2024 :  महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा हा बहुचर्चित आहे.. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप हा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आहे..प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर सिंचन घोटाळ्याचा विषय हा विरोधकांकडून बाहेर काढण्यात येतो.. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात खुद्द अजित पवारांनीच या विषयाला हात घातलाय...

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय. यावेळी ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले त्याच अजितदादांना हा विषय उकरुन काढलाय. सिंचन घोटाळ्यात तत्कालिन गृहमंत्री आर आर पाटील यांनी अडकवल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवर आर आर पाटलांची सही होती असा आरोप अजितदादांनी केलाय.

अजित पवार यांच्यावर जलसंपदा मंत्री असताना राज्यात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप आहे.. विरोधकांकडून अनेक वेळा त्यांच्यावर तसे आरोप सुद्धा करण्यात आलेत.. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवारांवर हा आरोप केला होता..

आर आर पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या तासगावमध्ये अजित पवारांनी संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभेत या विषयाला हात घालतं गौप्यस्फोट केलाय.. अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांनी कोणत्या परिस्थितीत फाईल दाखवली?.. याबाबत फडणवीसांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीये..  तासगावातून अजित पवारांनी थेट आर.आर. पाटलांवर या घोटाळ्याचं खापर फोडण्याचा प्रयत्न केलाय.. यावरून विरोधकांनीही अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय..

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी स्वतःहून जनतेच्या विस्मरणात गेलेल्या सिंचन घोटाळ्याचा विषय बाहेर काढलाय. आता हा मुद्गा त्यांच्यावरच उलटतोय की काय?,अशी शंका उपस्थित केली जातेय... सिंचन घोटाळ्यावरून विरोधक निवडणुकीच्या प्रचारात अजितदादांना घेरण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 70 हजार कोटी सिंचन घोटाळ्याच्या फाईल बाबतच्या वक्तव्याचा बच्चू कडू यांनी समाचार घेतलाय...आता ही बतावणी करून काही उपयोग नसल्याचं बच्चू कडू म्हणालेत....आमच्याकडे आले की देव आणि तुमच्यात आहे तो सैतान अशी भूमिका काही पक्षांची असतं असं म्हणत बच्चू कडूंनी भाजपवरही निशाणा साधलाय..