Devendra Fadnavis on Eknath Shinde: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. जर कोणाच्या मनात किंतू, परंतू असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे. आमच्या महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपाचं नेतृत्व मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांची निवड करेल त्या नावाला शिवसेनेचा पाठिंबा असेल असं जाहीर केलं आहे.
"आमच्या महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. आमचं कधीही एकमेकांप्रती वेगळं मत राहिलेलं नाही. आम्ही सर्व निर्णय एकत्र बसून घेतले आहेत. निवडणुकीपूर्वीही आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. आमच्या श्रेष्ठींसोबत बसून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं आणि तसंच होणार आहे. जर कोणाच्या मनात किंतू, परंतू असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
"मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची, उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
"भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल जो काही निर्णय घेईल त्याला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल. जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असं सांगितलं आहे. कोणतीही कोंडी, नाराजी नाही आहे. येथे कोणताही स्पीडब्रेकर नाही. महाविकास आघाडीचा स्पीडब्रेकर आम्ही काढला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह जो काही निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे," असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.
"मी स्व:तला मुख्यमंत्री न समजता सामान्य व्यक्ती म्हणून काम केलं. यामुळे मला कोणताही अडथळा येत नव्हता. सर्वसामान्यांसाठी महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे असं मी ठरवलं होतं. मी शेतकरी, सामान्य कुटुंबातून आलो आहे. कशाप्रकारे ते काटकसर करायचे हे मी पाहिलं होतं. त्याचवेळी मी संधी मिळाल्यानंतर असे लोक, लाडकी बहीण, ज्येष्ठ, शेतकरी अशा सगळ्यांसाठी काही ना का काही करायचं असं ठरवलं होतं. मला त्या वेदना समजत होत्या. महायुती सरकारच्या माध्यमातून मी सर्वांसाठी काम केलं," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
"आम्ही राज्य पहिल्या क्रमांकावर नेलं याचं समाधान आहे. या निवडणुकीत जो मतांचा वर्षाव झाला तो केवळ जे आम्ही काम केलं, निर्णय घेतले, सकारात्मकता दाखवली त्याचं फळ आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी माझी ओळख निर्माण झाली. सर्व बहिणींनी लक्षात ठेवलं. ही नवी ओळख मला सर्वात मोठी वाटते," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
"आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत. आम्ही लढून काम करणारे आहोत. एवढा मोठा विजय ऐतिहासिक आहे. याचं कारण जीव तोडून मेहनत घेतली, निर्णय घेतले. आम्ही घरी बसलो नाही. आम्ही मनापासून काम केलं. मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणार आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे महत्त्वाचं आहे," असंही विधान त्यांनी केलं.