Maharashtra Assembly Elections 2024 : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस असताना महाविकास आघाडीत गोंधळात गोंधळ पाहायला मिळतोय. छोट्या पक्षांना अतिशय कमी जागा दिल्यानं त्यांनी आपापल्या प्रभावक्षेत्रातील जागांवर मित्रांनाच आव्हान दिलंय. एवढंच नाहीतर भूम परांडा आणि सोलापूर दक्षिण जागेवरुन महाविकास आघाडीचे दोन दोन उमेदवार रिंगणात उतरलेत. त्यामुळं महाविकास आघाडीत महाबिघाडी होण्याची चिन्हं आहेत. उमेदवारी अर्ज भरायला केवळ दोन दिवस शिल्लक असताना मविआचे 20 मतदारसंघातील उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत. काही जागांवर मित्र पक्षांमध्ये तिढा आहे. काही जागांवर एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्यानं उमेदवार निश्चित होऊ शकले नाहीत.
महाविकास आघाडीत जागावाटपात गोंधळात गोंधळ पाहायला मिळतोय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस उरलेला असताना महाविकास आघाडीच्या अनेक जागांवर दोन-दोन पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. किंवा मित्रपक्षांनी एकापेक्षा जास्त एबी फॉर्म दिलेत. त्यामुळं महाविकास आघाडीत गोंधळात गोंधळ पाहायला मिळतोय.
महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांनी मोठ्या पक्षांविरोधात बंडाचं निशाण उभारलंय. भाकपला शिरपूरची जागा सोडलीय. भाकपनं वणी, भिवंडी पश्चिम, संभाजीनगर मध्य, हिंगणा आणि विक्रमगडवर दावा केलाय. माकपला 2 जागा सोडण्यात आल्यात. माकपनं सोलापूर मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघावर दावा केलाय.
सपाला भिवंडी पूर्व शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघ देण्यात आलेत. सपानं मालेगाव मध्य, भिवंडी पश्चिम आणि धुळे मतदारसंघावर दावा केलाय. शेकापला अलिबाग आणि श्रीवर्धन मतदारसंघ सोडण्यात आलाय. शेकापनं सांगोला, अलिबाग, उरण, पेण या मतदारसंघावर दावा ठोकलाय. हे झालं छोट्या पक्षाचं, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्येही जुंपल्याचं पाहायला मिळतंय.
सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना UBTनं रवी रतिकांत पाटील यांना उमेदवारी दिलीय. तरीही काँग्रेसनं दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर केलीय. भूम-परांडा मतदारसंघात शिवसेना UBTनं रणजित पाटील यांना उमेदवारी दिलीय. राष्ट्रवादी SPनं राहुल मोटेंसाठी आग्रह धरलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सोलापूर दक्षिणवर ठाम असल्याचं सांगितलंय.
काँग्रेसच्या हक्काच्या जागांवरचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सोडावा अशी भूमिका नाना पटोलेंनी घेतलीय.उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत एकमेकांची नाराजी दूर करण्याचा अवधी मविआला मिळणार आहे. त्यानंतर मात्र बंडखोरांना आवरण्यासाठी किंवा मैत्रीपूर्ण लढतींची तयारी प्रस्थापितांना करावी लागणार हे निश्चित...