Maharashtra Bandh : आज महाराष्ट्र बंद; जाणून घ्या कोणत्या सेवांवर होणार परिणाम

काय सुरु राहणार आणि काय बंद, जाणून घ्या एका क्लिकवर...

Updated: Oct 11, 2021, 07:01 AM IST
Maharashtra Bandh : आज महाराष्ट्र बंद; जाणून घ्या कोणत्या सेवांवर होणार परिणाम  title=
प्रतका

Maharashtra Bandh : उतर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनी आज (11 ऑक्टोबर )ला राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीनं महाविकासआघाडी सरकारकडून बंदची हाक देत हे सरकार राज्य आणि देशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगण्यात आलं.

शनिवारी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना लखीमपूर खीरी प्रकरणी बंदची माहिती दिली होती. राषट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील वरिष्ठांशईही बंदबाबत चर्चा झाली असून, याबाबतची रणनिती आखली गेल्याचंही ते म्हणाले.

अनेक व्यापारी संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होत कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड ट्रेडर्स असोसिएशननंही सोमवारी सर्व फळं, भाज्या, कांदा, बटाटा बाजार बंद असल्याचं सांगितलं. व्यापारी संघटनांनी सर्व व्यापाऱ्यांना बाजार बंद ठेवत या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. शिवाय शेतकऱ्यांनाही शेतमाल बाजारांमध्ये न आणण्याचं आवाहन केलं. त्यामुळं भाजीमंडईमध्ये सर्वसामान्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दळणवळणाच्या साधनांवर या बंदचा काहीसा परिणाम दिसू शकतो. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरीही बस, टॅक्सी सेवांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

एकिकडे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी राज्यबंदची हाक दिलेली असतानाच दुसरीकडे विरोधी पक्षाच्या बाकावर असणाऱ्या भाजपकडून या भूमिकेची निंदा करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षाकडून लखीमपूर खीरी येथील घटनेचं राजकारण करण्यात येत असल्याचं म्हणत टीका केली.

लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबरला चार शेतकऱ्यांसमवेत आठजणांचा मृत्यू झाला होता. भाजप कार्यकर्त्यांना नेणाऱ्या वाहनांनी धडक दिल्यामुळे या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं. सदर घटनेनंतर संतप्त जमावानं वाहनांमध्ये असणाऱ्यांना मारहाण केल्यामुळं त्यापैकी काहीजणांचा मृत्यू झाला होता.