Hsc Result: मंगळवारी बारावीचा निकाल जाहिर झाला. अनेक जण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले तर काही जणांच्या हाती निराशा आली आहे. मात्र, भाईंदर पूर्व येथील एका बारावीच्या विद्यार्थिनीने धक्कादायक पाऊल उचललं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाईंदर येथील विद्यार्थिनीने परीक्षेत 90 टक्के गुण मिळाले नाहीत म्हणून आत्महत्या केली आहे. या घटनेने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
विद्यार्थिनीला बारावीच्या परिक्षेत 78 टक्के मिळाले होते. मात्र तिला 90 टक्के हवे होते. यातूनच तिने मंगळवारी दुपारी किचनमध्ये असलेल्या नायलॉनच्या रश्शीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. 17 वर्षांच्या ही मुलगी मालाडच्या एका खासगी महाविद्यालयात कॉमर्समध्ये शिकत होती. मंगळवारी बारावीचा निकाल लागला तेव्हा विद्यार्थिनी थोडी निराश झाली होती.
निकाल लागल्यापासून ती थोडी शांतच होती. घरच्यांच्या नकळत ती किचनमध्ये गेली आणि दरवाजा बंद करुन घेतला. नंतर काही वेळातच एक व्यक्तीने किचनमध्ये तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्याने आरडाओरडा करुन परिसरातील नागरिकांना गोळा केले. तेव्हा या घटनेचा उलगडा झाला आणि इमारतीतील नागरिकांना या घटनेबद्दल कळले.
विद्यार्थिनीचे मुळ गाव उत्तराखंड हे असून तिचे वडिल महाराष्ट्रात ड्रायव्हरचे काम करतात तर आई गृहिणी आहे. विद्यार्थिनीला एकूण तीन भावंड आहेत. तिची मोठी बहिणी इंजिनिअर असून नोकरी करत आहे. तर दोन लहान भाऊ शिक्षण घेत आहेत. गेल्या 8 वर्षांपासून ते भाईंदरमध्ये राहत होते. विद्यार्थिनीचा स्वभाव खूप लाघवी होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार तिला बारावीत 90 टक्के मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र तिला 78 टक्के मिळाले होते. त्यामुळं ती निराश होती. परीक्षेनंतरही ती थोडी शांत शांतच होती. यासंबंधी तिच्या कुटुंबीयांनी चर्चादेखील केली होती. तेव्हा त्यांनी तिला समजावले होते आणि चिंता न करण्याबद्दलही समजावले होते.
परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो
अनेकदा परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो. अशावेळी आई-वडिलांनीच मुलांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे. मुलांचे मानसिक स्वास्थ चांगंलं असणं कोणत्याही परीक्षेसाठी खूप गरजेचे आहे. परीक्षा आणि रिझल्टच्या वेळी पालकांनी विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज असते. आई-वडिलांनी मुलांसोबत मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. मुलांचे योग्य वेळी समुपदेशन झाले तर ते अपयशाने खचून जाणार नाहीत.