गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : सततची नापिकी आणि निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतीव्यवसाय तोट्यात सापडलाय. राज्यातील शेतकऱ्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे शेतकरी पूरता वैतागला आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या एक अल्पभूधारक शेतकरीही निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्याने शेती सोडून नफ्याचा व्यवसाय करण्याचा निश्चय केला. या व्यवसायाला कर्ज मिळावं यासाठी त्याने थेट बँक गाठली. पण त्याला सुरु करायचा व्यवसाय ऐकून बँक अधिकारीही हैराण झाले.
नेमकं काय आहे प्रकरण
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावात राहाणारे कैलास पतंगे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाने इतर शेतकऱ्यांप्रमाणेच कैलास पतंगेही अडचणीत सापडले. त्यामुळे त्यांनी शेती सोडून नफ्याचा व्यवसाय करण्याचा निश्चय केला.
सर्वच व्यवसायांमध्ये कमालीची स्पर्धा निर्माण झाल्याने कोणता व्यवसाय करावा हे कैलास पतंगे यांना कळत नव्हतं. यावेळी त्यांना कुणीतही हेलिकॉप्टर विकत घेण्याचा सल्ला दिला. हेलिकॉप्टर भाड्याने दिल्यास मोठा फायदा मिळत असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे कैलास पतंगे यांनीही हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतला.
कैलास पतंगे यांना हा व्यवसाय योग्य वाटला आणि त्यांनी विलंब न लावता गोरेगाव इथल्या स्टेट बँकची शाखा गाठली. बँक व्यवस्थापकांना त्यांनी आपल्या नव्या व्यवसायाची माहिती दिली आणि थेट 6 कोटी 65 लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली. आपल्याकडे असलेली 2 एकर शेती विकायला आपण तयार आहोत. पण एवढ्या पैशात हेलिकॉप्टर मिळत नसल्याने यासाठी बँकेने कर्ज देऊन हातभार लावावा अशी मागणी यावेळी पतंगे यांनी बँक व्यवस्थापणाकडे दिली आहे.
कैलास पतंगे यांची ही मागणी ऐकून बँक व्यवस्थापकही हैराण झाले.