अमर काणे, झी मीडिया, नागपूर : अखेर विदर्भवासियांची (Vidarbha) मान्सूनची (Monsoon) प्रतीक्षा संपली असून मान्सून विदर्भात आज दाखल झाल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे विदर्भाची जनता आणि शेतकरी आनंदित झालेत. पुढील पाच दिवस विदर्भात सर्वत्र पाऊस राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
तीन महिने होरपळून काढणारा सूर्यनारायण आणि त्यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या प्रचंड उकाड्यामुळे विदर्भवासी हैराण झाले होते. कोकण, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सून गेल्या आठवड्यात पोहोचला असला तरी विदर्भात मान्सून कधी दाखल होणार याकडे तीन महिने सूर्याच्या चटके खाणाऱ्या विदर्भासियांचे यांचे लक्ष लागलं होतं.
अखेर आज 16 जूनला मान्सून विदर्भात पोचल्याचे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केलं. प्रादेशिक हवामान केंद्रनुसार नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या काही भागात गुजरात राज्य आणि संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भाचा बहुतांशी भाग, तेलंगणाच्या काही भागात पुढे सरकला आहे. मान्सून पुढे जाण्यासाठीही परिस्थिती अनुकूल आहे.
पुढील पाच दिवस विदर्भात मान्सूनची बॅटिंग
विदर्भात मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील पाच दिवस विदर्भात सर्वत्र पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यातही विशेष करून दक्षिण विदर्भातील काही भागात चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये दोन दिवसानंतर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.