पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस शिपाई पदासाठी १९ नोव्हेंबरला लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सहा जिल्ह्यांमध्ये ४४४ परीक्षा केंद्र राहणार आहेत. याकरता ११ हजार पोलिसांचा बंदोस्त तैनात करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून लेखी परीक्षा होत असून राज्यभरातून तरुणांनी अर्ज सादर केले. त्यातील पात्र ठरलेल्या १९०३१९ उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षार्थींची संख्या मोठी असल्याने त्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान होते. त्यामुळे यापूर्वी तीन ते चार वेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली.
लेखी परीक्षा शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत होणार आहे. परीक्षार्थींनी दुपारी एकपासून केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. हॉलतिकिट, सध्याचा फोटो असलेले ओळखपत्र, आवश्यक आहे. कॉपी तसेच डमी परीक्षार्थी, असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग होणार आहे.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. पाच केंद्रांसाठी एक भरारी पथक आहे. पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी व इतर तीन पोलीस, असे चार जणांचा या प्रत्येक पथकात समावेश राहणार आहे. परीक्षा सुरू असताना हे पथक पाहणी करणार आहे.
शहर | केंद्र | परीक्षार्थी |
नागपूर | ४७ | २४९९४ |
नाशिक | ३१ | १३८०० |
औरंगाबाद | ७७ | २१७२३ |
सोलापूर | २५ | ११८७८ |
अहमदनगर | ४७ | १७०६८ |
पुणे | २१७ | १००८५६ |