Ajit Pawar vs Sanjay Raut : शिरुर लोकसभा मतदासंघाचे अमोल कोल्हे (Amol kolhe) यांच्या आक्रोश मोर्चावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडण्याचे चँलेंज घेतले होते. त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना इशारा दिला होता. आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावर आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवनेरीपासून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची सांगता शनिवारी पुणे जिल्हाधिकार्यालयासमोर झाली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाषणात अजित पवार यांची मिमिक्री केली. “हवा बहुत तेज चल रही है, अजितराव. टोपी उड जायेगी” असे संजय राऊत म्हणाले. आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल, तर आधी तुम्ही पडाल असा इशारा संजय राऊत यांनी अजित पवारांना दिला.
यावर आता अजित पवार यांनी पुण्यात बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, अशा मोजक्या शब्दात अजित पवार यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
"राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करता येईल. काही गोष्टी चुकल्या तर त्यात काही दुरुस्ती करता येतील. काही नसताना बदनामी करण्याचे काम अलीकडे सुरू आहे. ते थांबले पाहिजे. ते आपल्या हिताचे नाही. जनता जनार्दन सर्व आहे. प्रत्येकाला मताचा अधिकार दिला आहे. .आज देशाच्या समोर नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही. आपल्या देशाची शान वाढतेय. 80 कोटी जनतेला अन्न धान्य वाटप होते. जनता उपाशी पोटी झोपू नये हाच उद्देश आहे. निधी वाटपात काही गैरसमज झाला असेल," असेही अजित पवार म्हणाले.