'सुनेत्रा पवारांनी फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे'; संजय राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut : भाजपने लोकसभेसाठी कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिल्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच सुनेत्रा पवार यांनी फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा असे संजय राऊत म्हणाले.

आकाश नेटके | Updated: Mar 3, 2024, 04:22 PM IST
'सुनेत्रा पवारांनी फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे'; संजय राऊत असं का म्हणाले? title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Politics : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपा शंकर सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. कृपाशंकर सिंह यांनी 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस सोडल्यानंतर कृपा शंकर सिंह यांनी दोन वर्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अनेक आरोप झाले होते. मात्र त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी मिळाल्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

"यातले सूत्र समजून घेतले पाहिजे. अजित पवार, अशोक चव्हाण, कृपाशंकर यांना तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट दिली. त्याच्यांवर गैर मार्गाने संपत्ती मिळवली असा आरोप होता. मात्र नंतर गृहमंत्री असताना त्यांनीच क्लीन चिट दिली," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

"कृपाशंकर सिंहांना तुरुंगात न पाठवता तिकीट दिले ही मोदी गॅरंटी आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट दिली ही मोदी गॅरंटी आहे. अशोक चव्हाण यांना तुरुंगात न टाकता राज्यसभा दिली ही मोदी गॅरंटी आहे. ज्यांना तुरुंगात टाकायचे त्यांना उमेदवारी दिली ही मोदी गॅरंटी आहे. 195 पैकी 70 लोक हे कृपाशंकर सिंह यांच्या सारखेच आहेत. ते दुसऱ्या पक्षातील आहेत. भाजपकडे स्वतःचे काही नाही. इतके मोठे नेते आहेत स्वतःचे काय आहे भाजपकडे? शिखर बँक घोटाळ्यात चक्की पिसायला अजित पवार यांना तुरुंगात पाठवणार होते. जवळपास चाळीस हजार कोटीचा घोटाळा होता. त्याचे काय झाले पुरावे कुठे गेले फडणवीस यांनी गिळले का? आता क्लीन चीट दिली असेल. गुन्हे दाखल झाले होते तरी कशी क्लीन चीट दिली. अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे," असेही संजय राऊत म्हणाले.

"अनिल देशमुखांना ब्लॅकमेल करण्यात आले, मी याचा साक्षीदार आहे. गृहमंत्री असताना प्रतिज्ञापत्र द्यायला सांगत होते. अनिल देशमुख यांच्याकडे मोठे पुरावे आहेत. देशमुख यांच्यावर दबाव होता. नेत्याची नावे घ्या असे सांगण्यात आले होते. देशमुख झुकले नाही लढले आणि सुटले," असे संजय राऊत यांनी म्हटलं.