Maharashtra Rain : राज्यात सुरु असणाऱ्या पावसानं जुलै महिन्यात अचानकच मोठ्या सुट्टीवर जाण्याचं ठरवलं आणि हा पाऊस ऑगस्ट संपायला आला तरीही हवा तसा परतलेला नाही. एकाएकी कमी झालेल्या पावसाच्या प्रमाणामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. तर, सर्वसामान्यांनाही ऐन ऑगस्ट महिन्यात ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जून अखेरी आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळं काही शहरांमध्ये पाणीकपातीचं संकट टळेल असंच सर्वांना वाटत होतं. पण, असं काही झालं नाही. कारण, पुन्हा एकदा पाणीकपात लागूच राहील अशाच सूचना पालिका प्रशासनानं केल्या. ज्यामुळं आता राज्यात पाऊस परतावा अशाच प्रार्थना नागरिक करताना दिसत आहेत.
गुजरातच्या दक्षिणेकडे सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयारक होत असून, त्याच्या परिणामस्वरुप पालघर, ठाणे, मुंबईचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी अपेक्षित आहे. असं असलं तरीही सध्या अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये मान्सूननिर्मितीसाठीची क्षमता नसल्यामुळं अद्यापही राज्यावर मान्सूनची कृपा झालेली नाही हे वास्तव मात्र नाकारता येत नाही असंच हवामान विभागानंही स्पष्ट केलं आहे.
सध्या राज्याचा किनारपट्टी भाग आणि मध्य महाराष्ट्राच्याही काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. पण, हा पाऊस समाधानकारक नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता थेट 25 ऑगस्टनंतरच राज्यात पावसासाठीच्या वातावरणनिर्मितीची सुरुवात होईल. कोकण पट्ट्याला याचा फायदा मिळू शकतो. तर, मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मात्र ऊन पावसाचा खेळ सुरु राहणार असून, बहुतांशी श्रावणसरीच बरसताना दिसतील.
पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या मान्सूनसाठी पूरक वातावरण नसून, येत्या 10 दिवसांमध्ये कुठेही मुसळधारीचा अशारा नाही. पण, हलका पाऊस नाकारताही येत नाही. सप्टेंबरच्या सुरुवातीला ही परिस्थिती काहीशी सुधारेल, असं म्हणत त्यांनी सध्याच्या घडीला विदर्भ आणि कोकणात पावसाची हजेरी दिलासा देणारी ठरेल असं म्हटलं.
महाराष्ट्रात पाऊस चिंता वाढवत असतानाच उत्तराखंड आणि (Uttarakhand, Himachal Pradesh) हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मात्र त्याच्या हजेरीमुळं हाहाकार माजला आहे. पुढील 24 तासांसाठी हिमाचलमधील कुल्लू, मंडी, कांगडा आणि शिमला जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, संपूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी या राज्यात ऑरेंज अलर्ट लागू आहे. उत्तराखंडमध्येही अशीच परिस्थिती असून, पाऊस थांबताच या भागात भूस्खलनाच्या घटना वाढताना दिसत आहेत.
दक्षिण भारताविषयी सांगावं तर, या भागांमध्ये मान्सून पुन्हा एकदा भक्कम पकड मिळवताना दिसत आहे. परिणामी दक्षिण भारतात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या पावसाचे परिणाम गोव्यापर्यंत दिसणार आहेत.