महत्त्वाची बातमी! दहावी, बारावीच्या हॉल तिकीटावरील 'तो' उल्लेख हटवणार

Maharashtra Board Exam: दहावी, बारावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट वर त्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता. तो आता हटवण्यात आला आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 19, 2025, 08:42 AM IST
महत्त्वाची बातमी! दहावी, बारावीच्या हॉल तिकीटावरील 'तो' उल्लेख हटवणार title=
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary scrap the decision of cast name on hall ticket of maharashtra board exam 2025

Maharashtra Board Exam: दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख केल्याने समाजातील सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतर आता महामंडळाने ही प्रवेशपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जातीचा उल्लेख काढून नवीन प्रवेशपत्र दिली जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे. 

दहावी, बारावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर त्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता. त्यानंतर विविध घटकांतून महामंडळावर टीका करण्यात आली होती. हा निर्णय विद्यार्थी हिताचा असल्याचं सांगत बोर्डाकडून त्याच समर्थन करण्यात आलं होतं. मात्र जनभावना लक्षात घेता हा निर्णय रद्द करण्यात आल्याचं राज्य शिक्षण मंडळाने म्हटलं आहे. 

बारावीसाठी नव्याने प्रवेश पत्र देण्यात येणार असून त्यासाठी 23 जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा प्रवेश पत्रे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तर दहावीसाठी 20 जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. असे मंडळाने स्पष्ट केले आहे. 

बोर्डाचे म्हणणे काय होते? 

दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्याना समाजकल्याण तसंच, अन्य विभागांकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी माहिती द्यावी लागले. दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांचे नाव, अडनाव, पालकांचे नाव, जन्मतारिख, जात याबाबत शाळेच्या रजिस्टरमध्ये बदल करता येत नसल्याने मंडळाने प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख केला असल्याचे मंडळाने म्हटलं होतं. 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे दिलेल्या वेळापत्रकावर विभागीय मंडळाचे नाव, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, आईचे नाव, विद्याशाखा, अपंगत्व, बैठक क्रमांक, केंद्राचे नाव यासह प्रथमच जात प्रवर्ग नमूद केला होता. दहावी, बारावीच्या प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख ही अयोग्य बाबा असल्याचे मन अनेकांनी नोंदवलं होतं. समाजमाध्यमांवरुनही अनेकांनी टीका केली होती.