मुंबई : राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात एकूण 5 टप्प्यांमध्ये लॉकडाऊनचे (Maharashtra Unlock to 5 step) नियम शिथील करणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार (Vijay Namdevrao Wadettiwar) यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी आहे, त्या ठिकाणी अनलॉक करण्याला सुरुवात होणार आहे. या नियमांची अमंलबजावणी उद्यापासून (4 जून) करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेदरम्यान वडेट्टीवार यांनी अनेक घोषणा केल्या. (Maharashtra unlocked in 5 phases informed Minister Vijay Wadettiwar)
पहिल्या टप्प्यात जमावबंदी शिथील करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील शहरांमध्ये लग्नासाठीची मर्यादा ही 25 वरुन 200 इतकी करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे?
पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 18 जिल्हे अनलॉक करण्यात आले आहेत. यामध्ये धुळे, जळगाव, नाशिक, बुलडाणा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये चित्रपटगृह, जिम, दुकानं, मॉल्स, मॉर्निंग वॉकला परवानगी देण्यात आली आहे. तसेच कार्यालयांना 100 टक्के उपस्थितने सुरु करण्यास मुभा दिली आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई नगर, मुंबई उपनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे.
तिसऱ्या टप्प्यात एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. यात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, अकोला, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला आहे.
चौथ्या टप्प्यात केवळ 2 जिल्हे आहेत. यात रायगड आणि पुण्याचा समावेश आहे.
वड्डेटीवार लोकलबाबत काय म्हणाले?
मुंबईचा समावेश हा दुसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील जनतेसाठी मुंबईमधील लोकल रेल्वे सेवा ही बंदच राहणार आहे. मात्र आठवड्याभरात रुग्णसंख्या आणखी कमी झाल्यास त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अंस वड्डेटीवारांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवाशाची परवानगी आहे. तर मुंबईतील बससेवा या 100 टक्के म्हणजेच पूर्ण क्षमतेने होणार असल्याचं म्हटलं आहे.
सरकारकडून दर आठवड्याने जिल्हानिहाय आढावा
दरम्यान सरकार या निर्णयानंतर दर आठवड्याने जिल्हानिहाय आढावा घेणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहून त्या जिल्ह्याचा टप्पा बदलण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.