Ajit Pawar Demand CM Post: 'बिहार पॅटर्न'प्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला मुख्यमंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्याच्या बातम्या सकाळपासूनच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी दोन दिवसांचा दौरा आटोपून दिल्लीला जात असताना मुंबई विमानतळावरील बैठकीमध्ये अजित पवारांनी ही मागणी केल्याचं वृत्त 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकाने दिलं होतं. मात्र अजित पवार यांनी या वृत्तासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी ही संपूर्ण बातमी खोटी असल्याचं सांगत फेटाळून लावली आहे.
पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी, "ज्या बातमीसंदर्भात तुम्ही विचारत आहात त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. अशी काहीही चर्चा झालेली नाही. अमितभाई मुंबईमध्ये आले होते म्हणून मी त्यांची भेट जरुर घेतली होती. वेगवेगळ्या ठिकाणी गणरायांचं दर्शन घेण्यासाठी ते आले होते. बाकी पण इतर गोष्टी आहेत. ज्यामध्ये कापूस प्रश्न, सोयाबीन प्रश्न आहे. कांदा निर्यातबंदी होऊ द्यायची नाही. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दोन पैसे कसे मिळतील ते पहायचा. एमएसपीचा प्रश्न होता. ते प्रश्न मी माझ्या पद्धतीने सांगितले. इतरही प्रश्नांबद्दल चर्चा झाली. मात्र जी 'हिंदू'ची बातमी धादांत खोटी आहे. त्यात तसूभर सुद्धा सत्य नाही," असं अजित पवार म्हणाले.
"किमान 50 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, हे काय आहे?" असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी वैतागून, "असं काहीही नाहीये. हे सगळं, सगळं थापा आहे. असं काहीही होणार नाही. सगळेजण बसून व्यवस्थितपणे 288 जागा महायुतीमधील कुठल्या कुठल्या घटकपक्षांना द्यायच्या हे ठरेल. त्यातलं बरंचसं ठरलेलं आहे. अजून थोडसं काही राहिलेलं आहे. ते थोड्याच दिवसात आपल्याला समजेल," असं अजित पवार म्हणाले.
"तुम्हाला स्वतंत्र लढवलं जाईल असं सांगितलं जात आहे," असं म्हणत एका पत्रकाराने अजित पवारांना प्रश्न विचारला. "मी म्हटलं का कधी? ज्यांनी सांगितलं आहे त्यांना विचार ना," असं म्हणत अजित पवारांनी हा प्रश्न उडवून लावला. सध्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणं आणि महायुतीच्या घटकपक्षांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना या योजनांचा लाभ देणं याकडे आमचं लक्ष आहे, असं अजित पवार म्हणाले.
'वर्षा' बंगल्यावरील देखाव्यामधून अजित पवारांचा फोटो गायब असल्याच्या मुद्द्यावरुन विचारण्यात आलं असता त्यांनी, "मीच त्यांना सांगितलं की माझा फोटो तिथे लावू नका. माझे फारच फोटो सगळीकडे सुरु झाले आहेत म्हटलं जरा कमी करा," असं उपहासात्मक उत्तर दिलं. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना, "लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे. ही सरकारची योजना आहे तर वेगवेगळे घटकपक्ष आपल्या पद्धतीने पण प्रमोट करणार आणि सरकार म्हणूनही प्रमोट करणार.