Big News About Devendra Fadnavis: राज्यामध्ये अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर महायुतीचं सेलिब्रेशन अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशीही सुरु होतं. विशेष म्हणजे एकीकडे सेलिब्रेशनला जोर आलेला असतानाच दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण बसणार याबद्दलचा संभ्रम कायम आहे. भारतीय जनता पार्टी हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्या खालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि तिसऱ्या क्रमाकांवर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पदावर भाजपा दावा सांगणार का याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे. असं असतानाच आता नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या राजकारणामधील सर्वात मोठी बातमी म्हणता येईल अशी ही बातमी आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री कोण याबाबत सस्पेन्स कायम असताना भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस यांच्याकरता अनुकूल आहे. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण ताकतीनिशी भाजपाच्या मागे उभा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत घसरलेला कामगिरीचा आलेख कमालीचा उंचावला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तर वाढलीच त्याचबरोबर भाजपालाही घवघवीत यश मिळालं आहे.
जून महिन्याच्या सुरुवातील लागलेल्या लोकसभा निकालामध्ये भाजपाला मोठा फटका बसल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत भाजपाने घेतली नाही अशी टीका झाली होती. या टीकेनंतर भाजपाने सावध भूमिका घेत विधानसभेला ही चूक सुधारली. विधानभेला भाजपाबरोबरच महायुतीच्या विजयामागे संघाच्या कार्यकर्त्यांचं पाठबळ नक्कीच कारणीभूत ठरलं. पडद्यामागे प्रचारापासून ते संघटनात्मक बांधणीपर्यंत अनेक गोष्टींमधून संघाने भाजपाला अधिक मजबुतीने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मदत केली. लाडकी बहीण, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ हैपेक्षाही प्रत्यक्षात मैदानात उतरुन संघ कार्यकर्त्यांना केलेल्या कामाचा अधिक प्रभाव मतदानावर आणि मताधिक्यावर दिसून आला.
मतदानाच्या दिवशीही फडणवीसांनी नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. अवघ्या 15 मिनिटांच्या या भेटीत काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असलं तरी सध्या संघ फडणवीसांवर खूष असून मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच बघू इच्छित असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता मातृक संस्थेचं हे मत केंद्रीय नेतृत्व स्वीकारणार का? फडणवीसांची मुख्यमंत्री पदाची वाटचाल अधिक सुखकर झाली आहे.