Maharashtra Weather News : वर्षाचा शेवट वादळी पावसानं; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये कडाक्याच्या थंडीसह गारपीटीचा इशारा?

Maharashtra Weather News : थंडीच्या दिवसांमध्ये राज्यात पावसाचा तडाखा. कोणत्या भागांमध्ये सावधगिरीचा इशारा... पाहा सविस्तर हवामान वृत्त...  

सायली पाटील | Updated: Dec 25, 2024, 11:42 AM IST
Maharashtra Weather News : वर्षाचा शेवट वादळी पावसानं; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये कडाक्याच्या थंडीसह गारपीटीचा इशारा? title=
Maharashtra Weather news storm Rain predictions and hailstorm too latest update

Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांपासूनच राज्यामध्ये अखेर थंडीचा जोर वाढला आणि डिसेंबर महिन्यामध्येसुद्धा थंडीचा कडाका पाहायला मिळाला. आता मात्र राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानानं नवं रुप घेतलं असून, पावसाची चाहूल लागत आहे. 

बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वमध्य क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा थेट परिणाम देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टी क्षेत्रावर पडत असून, महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव दिसून येत आहे. ज्यामुळं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये मंगळवारप्रमाणंच आताही पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून, या भागांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

हवामान विभागानं नाशिकमध्ये 3 दिवस पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातेय. तर गारपिटीच्या इशा-यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

हेसुद्धा वाचा : एका निर्णयामुळं मध्य रेल्वेवर आज प्रवाशांचा खोळंबा; याची तुम्हाला कल्पना आहे का? 

 

बंगालच्या उपसागरात तामिळनाडूपासून आंध्रच्या किनारपट्टी क्षेत्रापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून, बंगालच्या उपसागरावरील या बाष्पयुष्त वाऱ्यांमुळं महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. एकिकडे महाराष्ट्रात तापमानात चढ- उतार होत असतानाच दुसरीकडे देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये धुक्यामुळं अडचणी वाढताना दिसत आहेत. 

जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीला सुरुवात झाल्यामुळं अनेक उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे. तिथं हिमाचल प्रदेशात पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टीला सुरुवात झाली असून, मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र हाडं गोठवणारी थंडी अनुभवायला मिळत आहे. काश्मीरमध्येह खोऱ्यातील काही भागांना बर्फवृष्टीचा तडाखा बसला असून, श्रीनगरमध्ये मंगळवारी तापमान उणे 6 अंश असल्याचं निदर्शनास मिळालं.