Maharashtra Weather news : राज्यातून आता पहाटेच्या वेळी पडणाऱ्या थंडीनंही काढता पाय घेतला असून, उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये होणाऱ्या हवामान बदलांचे थेट परिणाम महाराष्ट्रावरही दिसत असून, विदर्भापासून कोकणापर्यंत तापमानवाढ नोंदवली जात आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या मोठी तापमानवाढ पाहायला मिळत असून पारा 37 अंशांच्याही पलिकडो पोहोचल्यामुळं या झळा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम करताना दिसत आहेत.
राज्याच्या कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही दुपारच्या वेळी उन्हाचा दाह सोसेनासा झाला आहे. तर, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या मैदानी क्षेत्रासह डोंगराळ भागांमध्येही ऊन आणखी तीव्र होत आहे. परिणाम डोंगरदऱ्यांमध्ये दिसणारी हिरवी खुरटंही आता या तीव्र सूर्यकिरणांनी करपून जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. राज्यातील अनेक डोंगररांगांवर आता दूरदूरपर्यंत रखरखाट पाहायला मिळत असून, उष्णतेच्या लाटा भीती वाढवत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती असताना आता एप्रिल, मे आणि जून महिन्यापर्यंत नेमकं कसं चित्र असेल असाच प्रश्न अनेकांना पडत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या कर्नाटकच्या दक्षिण भागापासून आंध्र प्रदेशातील उत्तर भागापर्यंचत वाऱ्याची चक्राकार दिशा पाहायला मिळत आहे. तर, राजस्थानापासून मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टाही तयार थाला आहे. याचे परिणाम विदर्भातील ढगाळ वातावरणाच्या रुपात दिसत असले तरीही इथं तापमानात वाढ झाल्यामुळं उकाडा अधिक त्रासदायक ठरू लागला आहे.
SKYMET या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार जम्मू काश्मीरसह नजीकच्या भागांमध्ये सध्या पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं तिथं पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातही हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, हिमाचल आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर भागांमध्ये पावसाची हजेरी असेल, तर येथील पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. देशाच्या उत्तरेकडे हवामानात बरेच बदल होत असले तरीही महाराष्ट्रात मात्र उन्हाचंच पारडं तुलनेनं जड असेल.