महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट

Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच.   

सायली पाटील | Updated: Apr 19, 2023, 11:45 AM IST
महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट  title=
maharashtra weather Unseasonal Rain heat wave know all india Weather Forecast latest update

Maharashtra Weather News: राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणारा अवकाळी पाऊस काशी अंशी काढता पाय घेताना दिसत आहे. असं असलं तरीही राज्यातील काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे. सध्याच्या गडीला हवामानात झालेले बदल पाहता राज्यातील बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किंबहुना राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 38 अंशांच्या वर गेलं असून उष्णतेचा दाह आता अडचणी वाढवताना दिसत आहे. इथं ठाण्यातील मुरबाडमध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्यामुळं आरोग्य विभाग आणि हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. (maharashtra weather Unseasonal Rain heat wave know all india Weather Forecast latest update )

पुढचे दिवस उष्णतेचे... 

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंगदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ज्यामुळं पुणे नजीकच्या भागातील तापमान 40 अंशांवर पोहोचू शकतं. त्यातच चंद्रपुरात तापमानाचा आकडा 43.6 अंशांवर पोहोचल्यामुळं उष्णतेची तीव्रता लक्षात येत आहे. पुढील काही दिवस चंद्रपुरात अशीच परिस्थिती राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, तिथे वाशिमचं तापमानही 42 अंशावर पोहोचलं आहे, तर परभणीचा पारा 41 अंशांपर्यंत गेला आहे. तापमानाचे हे आकडे पाहता सध्या रादज्यात सकाळच्या वेळी रस्त्यांवर नागरिकांची गर्दीही कमी दिसू लागली आहे. 

हेसुद्धा पाहा : Heat Stroke : उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल? राज्याच्या आरोग्य विभागाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

 

आरोग्याची काळजी घ्या 

तापमानाचा सातत्यानं वाढणारा पारा आणि मधूनच येणारी अवकाळीची सर पाहता नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सकाळी 11 ते दुपारी 3/4 या वेळेत घराबाहेर न पडण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सध्या सूती कपडे, टोपी, गमछा, रुमाल, छत्र्यांचा वापर होताना दिसत आहे. त्यातच उष्माघाताचा धोका पाहता राज्याच्या आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना काही प्राथमिक उपाय योजण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. चहा, कॉफी, शीतपेय टाळा, लिंबू सरबत, नारळ पाणी, माठातील पाणी पिण्याला प्राधान्य द्या असा सल्ला देण्यात आला आहे. 

.... तरीही अवकाळीचं सावट कायम 

राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरु झालेला असताना काही भाग मात्र यासाठी अपवाद ठरत आहे. त्यातील एक म्हणजे पुणे. पुढचे 2 दिवस पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेधळेने हा अंदाज वर्तवला आहे. पुणे शहरासह हवामान खात्यानं पुणे जिल्ह्यालाही यलो अलर्ट जारी केला आहे. 
दरम्यान, तिथे हिंगोलीतही अवकाळीनं काढता पाय घेतलेला नाही. मंगळवारी हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याची माहिती समोर आली. तर, साताऱ्यालाही गारपीटीनं झोडपून काढलं. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकं आणि फळांचं नुकसान झालं. 

देशातील हवामानाचा आढावा 

पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, झारखंड या भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येणार आहे. तर, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागापासून केरळच्या किनारपट्टी भागापर्यंत अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार आहे असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 

पुढील 4 दिवस हिमालयाच्या पश्चिमेला येणाऱ्या भागांमध्ये पावसाच्या तुरळक ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसणार आहेत. तर, पंजाब, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, उत्तल प्रदेशात 18 ते 21 काळात सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान या भागांमध्ये हलक्या स्वरुपाती हिमवृष्टी आणि काही भागांत पुढील दोन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.