Satara Loksabha News : लोकसभेच्या जागावाटपावरून भाजपविरूद्ध राष्ट्रवादी (BJP vs NCP) असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या जागेवर (Satara LokSabha Constituency) राष्ट्रवादीनं दावा केलाय तर इथं आपलाच उमेदवार असेल असं भाजप नेते सांगत आहेत. त्यामुळे आता महायुतीत वादाची ठिणगी पेटल्याचं पहायला मिळतंय. कर्जतमध्ये कार्यकर्त्यांच्या शिबीरमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणार असल्याचं सांगितलं होतं. तर आम्ही सातारा मतदारसंघ कोणत्याच परिस्थितीत सोडणार नाही, असं म्हणत जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी थेट अजित पवारांना थेट आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय.
कर्जतमधल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांनी साताऱ्यातील जागेवर दावा केल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार यावरून चांगलंच रणकंदन सुरू झालंय. शिंदे गटाचे पुरूषोत्तम जाधव यांनी या मतदारसंघावर दावा केलाय. अशातच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनीही आक्रमक होत साताऱ्याची जागा (Satara LokSabha Constituency) आमचीच असल्याचं म्हटलंय.
भाजप सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने बूथ रचनेची गेल्या तीन वर्षापासून बांधणी करत आहे. जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय पक्षनिरीक्षकांचा सातत्याने येथे दौरा सुरू आहे. सध्या आठही विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्राबल्य वाढले असून भाजप हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभेची जागा भाजपचा उमेदवार लढवणार आहे, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा - मुंबई-पुण्यासह 40 शहरांवर ड्रोन हल्ल्याचा कट, ISISच्या दहशतवादी प्लॅनचा पर्दाफाश!
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्याच भाजपच्या उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी पराभूत केलं. राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी अजितदादांनी साताऱ्यावर दावा कायम ठेवलाय. तर भाजपही साताऱ्यासाठी आग्रही असल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. त्यामुळे आता अजित पवारांना सातारमध्ये नेमकं किती पाठबळ मिळणार? की भाजप अजितदादांचाच गेम करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.