'महाराष्ट्रात शब्दांची अदला बदल झाली अन्...'; मराठा, धनगर आरक्षणप्रश्नी उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट

Maratha Reservation​ : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत उदयनराजे भोसले यांनी मराठा आणि धनगर आरक्षणप्रश्नी लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 20, 2023, 08:29 AM IST
'महाराष्ट्रात शब्दांची अदला बदल झाली अन्...'; मराठा, धनगर आरक्षणप्रश्नी उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट title=

Maratha Reservation : राज्यातला मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. एकीकडे, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली आहे. अशातच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरक्षणावर लवकर तोडगा काढला जावा अशी विनंती केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक उभे करावे तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

"मराठा आरक्षण विषय दिवसेंदिवस फारच गुंतागुंतीचा आणि गंभीर होत चालला आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर विशेष लक्ष घालून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. अशी मागणी आम्ही केली. महाराष्ट्रातील आरक्षण परिस्थिती वर यावेळी चर्चा करण्यात आली. मराठा सर्व समाजातील समाज घटकांना बरोबर घेऊन जाणार म्हणून ओळखला जाणारा हा समाज आहे. परंतु आता समाजातील मुला मुलींची व कुटुंब ची अर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे. समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी फी भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती केली. तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी हा समाज अनेक वर्ष झटत आहे. इतर राज्य मध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे. परंतु महाराष्ट्रात शब्दांची आदल बदल झाली आहे. महाराष्ट्रात धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही तरी याबाबत आपण लक्ष घालावे व धनगर समाजाला आरक्षण द्यावे हि विनंती केली यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयावर सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले," असे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने मास्टर प्लान तयार केला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवणार आहे. फ्रेब्रुवारी महिन्यात मुंबईत हे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकार मुंबईत विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे. तर, जरांगेंनी मात्र विशेष अधिवेशनाला विरोध केलाय. याच अधिवेशनाला मुदतवाढ देऊन आरक्षणाचा कायदा पारित करण्याची मागणी त्यांनी केली होती.