Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला 40 दिवसांचा वेळ संपला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याचबरोबर, प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. यासोबतच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना, पुढाऱ्यां गावबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काय बोलणार पुढची भूमिका काय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. सरकारला दिलेला वेळ संपल्याने मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा आमरण उपोषणावर बसणार आहेत. त्याआधी ते सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भूमिका मांडणार आहेत.
दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करुन उपोषण करु नये असं सांगितलं. मात्र त्यानंतरही जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यासोबत बोला पण उपोषण थांबवता येणार नाही. तुमच्यातील एक माणूस राहीला नाही तर काही नाही. मी तुमच्यात नसेल अजून काय होणार आहे. तुम्ही पटकन आरक्षण द्यायला हवं. मुख्यमंत्र्यांनी 40 दिवस मागितले आम्ही ते दिले. आमची चूक काय? तुमच्या समितीने पंधरा दिवस काम नाही केलं, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी आजपासून उपोषणावर बसणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची संभाजीराजे छत्रपती भेट घेणार आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास संभाजीराजे जरांगे पाटलांना भेट घेणार आहे. त्यामुळे आता दोघांमध्ये काय चर्चा होते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत दसरा मेळाव्यात भाषण करत मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचं आश्वासन केलं. मी कार्यक्रमात असल्याने पाहिलं नाही. आमचा दिवसरात्र कार्यक्रम सुरु आहे. मला बघायला वेळ मिळाला नाही. पण त्यांनी छत्रपतींची शपथ घेतली असेल तर ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण हवं आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मान ठेवला. आम्ही 40 दिवस दिले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देवून आमचा सन्मान करावा," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.