नवी दिल्ली : मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्ट उद्या निकाल देणार आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण प्रकरण निकालासाठी लिस्टेड करण्यात आले आहे. मराठा समाजासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण उद्या मराठा आरक्षणावर शेवटचा निकाल लागणार आहे.
महाराष्ट्राने संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण कायदा पारित केला. सर्वोच्च न्यायालयात १०२ वी घटनादुरूस्ती आणि ५० टक्के मर्यादा या दोन्ही प्रमुख मुद्यांवर राज्य सरकार व आरक्षण समर्थक खासगी याचिकाकर्त्यांकडून प्रभावी युक्तिवाद झाला. १०२ व्या घटनादुरूस्तीमुळे राज्यांचे अधिकार बाधित होत नाहीत, अशी स्पष्टोक्ती केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिली. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशीही मागणी सर्व राज्यांनी केली. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्राला न्याय मिळेल, याविषयी मी आशावादी आहे. असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. मराठा आरक्षणावर उद्या अंतिम निकाल येईल. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
राज्य सरकारनं मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं होतं. राज्य सरकारनं दिलेल्या मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आल्यानंतर न्यायालयानं स्थगिती दिली होती.