Maharashtra weather update: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये वातावरणात बदल पहायला मिळतोय. काही भागांमधून थंडी अचानक गायब झाली असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. कमाल तापमानाचा पारा वाढत असतानाच दुसरीकडे विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात 24 तारखेनंतर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वातावरणातील हा बदल दिसून येऊ शकतो, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, 25 आणि 26 फेब्रुवारी या कालावधीत विदर्भातील अकोला आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई तसंच पुण्यामध्ये कोरडं हवामान राहणार आहे. तर राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
राजधानी दिल्लीमध्ये देखील हवामानातील बदल दिसून येतोय. तापमानातील चढउतार सुरूच असून, ते फेब्रुवारी अखेरपर्यंत दिसून येणार असल्याचा अंदाज आहे. या काळात सूर्यप्रकाश, कधी ढग तर कधी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पर्वतांवरून एकामागून एक येणारे हलके आणि जोरदार वेस्टर्न डिस्टर्बन्स हे हवामानातील या बदलाचे कारण आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारीपर्यंत तब्बल 15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. उत्तर पंजाब, उत्तर हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, केरळ, झारखंडच्या काही भागासह ईशान्य राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे तब्बल 3-4 दिवस वातावरणातील बदल दिसून येणार आहे.