सांगली / कोल्हापूर : राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. तर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील अकोलमधील नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तर सांगलीत महामार्गावर दूध ओतून सकाळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. दूध खरेदी दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी भाजपनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु केले आहे. कोल्हापूर, सांगलीत आज दूधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले तर काही ठिकाणी दुधाचा अभिषेक करण्यात आला.
राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन सुरु । दूध खरेदी दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी भाजपनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु ।कोल्हापूर, सांगलीत आज दूधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले तर काही ठिकाणी दुधाचा अभिषेक https://t.co/kpo9phlA1j
@ashish_jadhao pic.twitter.com/gOeLUH078x— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 21, 2020
शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले. सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरु महामार्गावर येलूर फाटा येथे दुधाचा टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दूध संघांची वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आले.
राज्यात गाईच्या दुधाला सध्या प्रतिलिटर १६ ते २० रुपये दर मिळत आहे. हा दर खूपच कमी असल्याने सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे. देशांतर्गत दूध दर नियंत्रित राहण्यासाठी दूध पावडरीची आयात बंद करावी, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. स्वाभिमानीचे आंदोलन होण्यापूर्वीच सोमवारी भाजपसह मित्रपक्षांनी राज्यभर आंदोलन करुन दूध दराचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने याकडे लक्ष न दिल्याने हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
पुणे-बंगळुरु महामार्गावर येलूर फाटा येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाचा टँकर अडवून त्यातील हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले. संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे आंदोलनात सहभाग घेतला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथील आंदोलनात सहभाग घेऊन गोकुळ दूध संघाचे दुधाचे कॅन रस्त्यावर ओतले. तर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध, अशी माहिती संघटनेचे डॉ.अजित नवले यांनी दिली.