मुंबई : मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी राज्यातील पत्रकारांना 'फ्रंटलाईन वर्कर्स' घोषित करुन त्यांना कोविड लसीकरण आणि इतर सुविधा मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. करोना महासाथीविरोधात सुरु असलेल्या लढाईत राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस यांप्रमाणे पत्रकार अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. वार्तांकनाचं आपलं काम पत्रकार बांधवांना निर्धोकपणे करता यावं यासाठी त्यांचा समावेश 'फ्रंटलाईन वर्कर्स'च्या यादीत करण्यात येवून त्यांना संबंधित सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात असे अमित ठाकरे म्हणाले.
पत्रकारांना प्राधान्याने कोविड-१९ लसीकरण करण्यात यावे अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली. पत्रकार, छायाचित्रकार तसंच कॅमेरामन यांचे लसीकरण करण्यासाठी आपण जिल्हा तसंच तालुका पातळीवरील त्यांच्या संघटनांना विश्वासात घेण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.
करोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीत पत्रकार वार्तांकनाचं आपलं काम अविरतपणे करत आहेत. त्यांच्यामुळेच या कठीण काळात राज्यभरातल्या ठिकठिकाणची वास्तव स्थिती बातम्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. दु्दैवाने, वार्तांकनाचं हे काम करताना अनेक पत्रकार, छायाचित्रकार तसंच कॅमेरामन यांना करोनाची लागण होऊन त्यामुळे त्यांपैकी काहींना आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मागणी करत असल्याचे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपुर्वी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.