मुंबई : फटका गँगच्या दोन जणांना पोलिसांनी मोबाईल चोरी प्रकरणात ताब्यात घेतलं आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यात प्रवास कऱणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल, तसेच सेन्ट्रल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल ही गँग चोरत होती. फटका गँगच्या या दोन जणांना कल्याण रेल्वे स्टेशनवर अटक कऱण्यात आली आहे, आता हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. फटका गँगच्या या दोन्ही जणांची ओळख पटली आहे. यातील एकाचं नाव अजित झडे, तर दुसऱ्याचं नाव दीपक ठोकळ आहे. हे फटका गँगमधील असल्याची प्राथमिक माहिती आहे, असं रेल्वेचे पोलीस अधिकारी समाधान पवार यांनी म्हटलं आहे.
या गँगला 'फटका गँग' यासाठी म्हणतात की, जेव्हा रेल्वे सिग्नलवर उभी असेल, किंवा प्लॅटफॉर्मवरून लोकल नुकतीच निघत असेल, तेव्हा दारावर स्टाईलने मोबाईलवर बोलणाऱ्यांच्या हाताला फटका मारून ही गँग मोबाईल लांबवते. अनेकवेळा काठीने देखील मोबाईल हातात असणाऱ्या हाताला हे फटका गँगवाले फटका मारतात.
मागील काही आठवड्यापासून कल्याण रेल्वे पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात या तक्रारी येत आहेत, असं पोलीस अधिकारी समाधान पवार यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी आरोपी अजित झडेला ताब्यात घेतलं, आणि चौकशीनंतर दीपक ठोकळला.
या दोनही आरोपींकडून २० पेक्षा जास्त चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यात विविध ब्रॅण्डचे मोबाईल आहेत. कल्याण रेल्वे पोलिसांकडे या काळात १० पेक्षा जास्त मोबाईल चोरीच्या केसेस आल्या होत्या.
रेल्वे पोलिसांनी आणखी दोन जणांना मोबाईल चोरी प्रकरणी अटक केली आहे. यात आरोपी गौतम सोनवणे आणि संजय मोरे यांचा समावेश आहे. चोरीचे मोबाईल फोन विकण्याचा गुन्हा या आरोपींवर दाखल करण्यात आला आहे.