आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : संपूर्ण देशभरात जिथे जिथे म्हणून जंगल आहे तिथे तिथे 'मोह' किंवा 'महुआ' म्हणजे जंगलातला खरा मेवा... पण मोह म्हणजे मोहाची दारू अस समिकरणच बनलंय. त्यामुळं अत्यंत औषधी असणारी ही मोहवृक्ष सुटाबुटातल्या सायबानं वाळीत टाकली. पण आता मात्र या 'मोहा'च्या मोहात शहरातला माणूसही प्रेमानं अडकतोय.
चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर कृषी विभागाचा सरस महोत्सव सुरूय. इथल्या खाद्यपदार्थांच्या एका स्टॉलवर सतत गर्दी. कारण इथे मिळतेय भाकरी... भाकरी... अस्सल मराठमोळा पदार्थ... चुलीवर भाजलेली भाकरी, त्यावर लोणी किंवा ठेचा किंवा झुणका म्हणजे ब्रम्हानंदी टाळीच...
पण इथली भाकरी खासच. ही भाकरी आहे मोहाची... नावाप्रमाणेच सगळ्यांना मोहवणारी... जिल्ह्यातल्या जंगलात मोहवृक्षांची संख्या अधिक... आदिवासींसाठी मोह म्हणजे कल्पवृक्षच... यात औषधी गुण उपकारक पण केवळ मोहफुलं सडवून बनवलेल्या दारुमुळे मोहवृक्ष पांढरपेशांच्या संवादातूनही वगळून टाकलेला... जिल्ह्यात अचानक दारूबंदी झाली. आता दरवर्षी गोळा केलेली मोहफुलं कुठल्या कामी आणायची हा यक्षप्रश्न... घरीच बनवत असलेल्या मोहाच्या भाकरीची चव शहरातल्या लोकांनाही चाखायला दिली तर. मग काय ब्रम्हपुरीच्या चेकबोथली या लहानशा गावातल्या महिला बचत गटानं या मोहवणाऱ्या भाकरीला घडवला शहराचा प्रवास...
जसा मोह शहरातल्या जीवनातून वाळीत टाकलेला तसा मोहाच्या भाकरीचा स्टॉलही अगदी एका कोपऱ्यात न दिसणाराच... पण एकदा का तुम्ही ही भाकरी खाल्ली की मग तुमची पावलं सारखी तिकडेच वळतात. गरमागरम भाकरी आणि सोबत जवसाची चटणी किंवा ठेचा... या स्टॉलवर येऊन गेलेल ग्राहक या भाकरीच्या पुरते प्रेमात पडलेत, एवढे की या महिलांनी आणलेलं मोहाचं सगळं सारण संपलंय. पण खवय्यांचा ओघ संपता संपत नाहीय.
मार्चपासून मोह फुलं गळायला लागतात. मग फुलं वाळवली जातात. गरजेच्यावेळी ही फुलं पाण्यात भिजवून पुरणासारखी शिजवतात. मग पुरण यंत्रातून काढतात. कणकेत हे सारण एकजीव केलं जातं, आणि मग थापून भाजली जाते मोहाची भाकरी... एरवी मोह हा शब्द ऐकुनच नाकं मुरडणारे या स्टॉलला आवर्जून भेट देताना दिसतायत.या भाकरीची चवही भारीच. पण याचं आता योग्य ब्रॅन्डिंग गरजेचं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारूबंदीमुळं मोहफुलाबाबत झालेलं हे व्हॅल्यू अॅडिशन अफलातूनच... तशी ही भाकरी नवी नाही कारण वनव्याप्त क्षेत्रात हिवाळ्यात ती घराघरात खालली जाते. पण आता जंगलातल्या आदिवासीची झोपडी ते शहरातला सरस महोत्सव असा या भाकरीचा प्रवास...