Maharashtra Lok Sabha Election 2024 Opinion Poll: देशातील सर्व राजकीय पक्ष सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत. भाजपाने दंड थोपटले असून यावेळी एनडीए 400 चा टप्पा ओलांडेल असा निर्धार केला आहे. भाजपा 370 तर मित्रपक्ष 30 हून अधिक जागा जिंकतील असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. दरम्यान इंडिया टुडे आणि सी वोटरने मिळून 'मूड ऑफ द नेशन' सर्व्हे केला आहे. यामध्ये कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचे अंदाज लावण्यात आले आहेत.
नरेंद्र मोदीच अद्याप भाजपाचा मुख्य चेहरा असल्याने इंडिया आघाडीसमोर मोठं आव्हान आहे. त्यातच नितीश कुमार बाहेर पडले असल्याने इंडिया आघाडीत बिघाडी झाली आहे. याशिवाय महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील स्थिती वेगळी असल्याने त्याचाही निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशात भाजपा युतीला 80 पैकी 72 जागा मिळत आहेत. महत्वाचं म्हणजे भाजपाला क्लीन स्वीप मिळत आहे.
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने काय निकाल लागेल याकडे देशाचं लक्ष असेल. जाणून घ्या महाराष्ट्राचा सर्व्हे काय सांगत आहे.
महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडी भाजपा, शिंदे आणि अजित पवार यांच्यावर वरचढ होताना दिसत आहे. मूड ऑफ द नेशनमध्ये महायुतीला 48 पैकी 26 जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपा युतीला एकूण 40.5 टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. तर महायुतीला 44.5 टक्के मतदान होईल.
भाजपा युतीला 22, काँग्रेसला 12 आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 14 जागा मिळतील असा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी महाविकास आघाडी 48 पैकी 35 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासह आम्ही निवडणूक लढत आहोत. आम्ही सर्व मिळून 30-35 च्या पुढे जाऊ असं संजय राऊत म्हणाले आहेत.
सर्व्हेमध्ये भाजपाला पुन्हा एकदा क्लीन स्वीप मिळताना दिसत आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने सर्व 26 जागांवर विजय मिळवला होता. गुजरातमधील जनता यावेळीही भाजपावरच विश्वास दाखवताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपाला एकूण मतांच्या 62.1 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 26.4 टक्के मतं मिळत आहेत. इतर छोट्या पक्षांना 12 टक्के मतं मिळत आहेत.
दरम्यान सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशात भाजपा युतीला 80 पैकी 72 जागा मिळत आहेत, तर उत्तराखंडमधील पाचही जागा, हिमाचलमधील चारही जागा, हरियाणामध्ये 10 पैकी 8, पंजाबमध्ये दोन, मध्यप्रदेशात 29 पैकी 27, तर छत्तीसगडमध्ये 11 पैकी 10 जागा मिळताना दिसत आहेत.