सुरेंद्र गांगण / मुंबई : Mumbai-Goa highway work : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, चिपळूण जवळील परशुराम घाटातील महामार्गाचे रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळसाप एक महिना महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. (Mumbai-Goa highway on the widening of roads in parashuram ghat will continue from april 22 for a one month)
रुंदीकरणाच्या कामासाठी 22 एप्रिलपासून दुपारी 12 ते 5 कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. चिपळूण येथे झालेल्या स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून हे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र, आता 22 एप्रिलपासून महिन्याभरासाठी परशुराम घाटात रुंदीकरणाचे काम सुरु राहणार आहे.
परशुराम घाट रुंदीकरणाचे काम आजपासून सुरु होणार होते. मात्र, खेडमधील लोटे एमआयडीसीतील कंपन्यांकडून स्थानिक प्रशासनाकडे नियोजनासाठी दोन दिवसांची मुदत मागण्यात आली होती. त्यामुळे 22 एप्रिलपासून परशुराम घाटातील वाहतुकीबाबतचे बदल लागू होतील, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आले.
दरम्यान, परशुराम घाटपरिसरात पर्यायी मार्गाबाबत पाहणी करण्यात आली आहे. तसेच वाहतूक पर्यायी मार्गे वळवताना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चार ठिकाणी पोलीस चौकी उभारली जाणार आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
22 एप्रिलपासून लहान वाहने, राज्य परिवहन मंडळाची वाहने आणि लोटे एमआयडीसीतील बसेसची वाहतूक ही लोटे-चिरणी-आंबडस मार्गे चिपळूण अशी सुरु ठेवण्यात येणार आहे. मात्र, याबाबत महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून संबंधित वाहतूक 22 एप्रिल 2022 पासून बंद राहणार असल्याची माहिती हाती आली आहे.