मुंब्रा : ठाण्यातल्या मुंब्रा भागात अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल शोधली आहे. मुंब्रा पोलिसांनी गर्दुल्ल्यांची धिंड काढत त्यांना चांगलीच अद्दल घडवली. अंमली पदार्थांची विक्री करणा-या आठ जणांना मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढली. हे गुर्दुल्ले शाळा तसेच कॉलेजबाहेरील मैदानात तसंच पानाच्या टपरीवर अंमली पदार्थांची खुलेआमपणे विक्री करतात. यात गांजा, कोरेक्स सारख्या प्रतिबंधित खोकल्याच्या औषधाचा प्रमुख्यानं समावेश आहे. विशेष म्हणजे धिंड काढताना हे नशेबाज अब नशा नही करेंगे अशा घोषणा देखील देत होते.
ड्रग्सच्या भस्मासुराने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ड्रग्स माफिया युवा पिढीला लक्ष्य करतात. शाळा आणि कॉलेजच्या बाहेर अमंली पदार्थांची विक्री करतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुंब्रा पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी रशीद कंपाउंड येथे छापा मारला. अचानक टाकलेल्या धाडीत नशा करणाऱ्या एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून एक किलो गांजा आणि 15 कोरेक्सच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांची नंतर मुंब्रा शहरातून चक्क धिंड काढण्यात आली. जेणेकरून इतरांना जरब बसेल व ते ड्रग्स घेण्यापासून लांब राहतील.