विधानसभा निवडणुकीत उपराजधानी नागपुरातलं राजकारण कूस बदलणार का?

Maharashtra politics : नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी... नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतलेली दीक्षाभूमीही नागपूरलाच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजपाच्या पॉवरवरफुल नेत्यांचे शहर असलेल्या नागपूरचं राजकारण बदलणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.

वनिता कांबळे | Updated: Oct 9, 2024, 11:41 PM IST
 विधानसभा निवडणुकीत उपराजधानी नागपुरातलं राजकारण कूस बदलणार का? title=

Nagpur Vidhan Sabha Election 2024 :  विधानसभा निवडणुकीत उपराजधानी नागपुरातलं राजकारण कूस बदलणार का याची उत्सुकता निर्माण झालीय. गडकरींचं नागपूर जसं ओळखलं जातं तसं फडणवीसांचं नागपूर अशीही ओळख आहे. नागपुरातील सहा मतदारसंघापैकी फडणवीसांचा एक मतदारसंघ असला तरी विधानसभा निवडणुकीत नागपूरच्या सहा मतदारसंघांचा निकाल काय लागतो याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात फडणवीसांना अनिल देशमुख आव्हान देण्याची शक्यता आहे. तसा सामना न झाल्यास काँग्रेस पुन्हा प्रफुल्ल गुडधे पाटलांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. 

पूर्व नागपूरमधून लढण्यासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची भली मोठी रांग लागलीय. संगीता तळमळे, पुरुषोत्तम हजारे आणि संधी मिळाली तर अभिजीत वंजारीही रिंगणात उतरु शकतात. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी उमेदवारीवर दावा ठोकलाय. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व नागपूर मतदारसंघात कृष्णा खोपडे विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज आहेत. पण तिथं भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी यावेळी नागपुरात सहाच्या सहा जागा भाजप जिंकणार असा दावा केलाय.

 नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांना स्वकियांचा सामना करावा लागू शकतो. काँग्रेसमधून बडतर्फ नेते नरेंद्र जिचकार यांनी त्यांच्याविरोधात रणशिंग फुंकलंय. भाजप दयाशंकर तिवारी, नरेश बरडे यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार यावर मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे.

नागपूर मध्य मतदार संघामध्ये भाजपा विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना चौथ्यांदा उमेदवारी न देता नवा चेहरा देणार असल्याची चर्चा जोरात आहे ......भाजपाकडून आमदार प्रवीण दटके या मतदारसंघात जोरदार तयारीला लागले आहे... मात्र भाजपा हलबा समाजाशिवाय दुसरा उमेदवार देणार का हा खरा प्रश्न आहे... तर काँग्रेसकडून गेल्या वेळेस थोडक्यात पराभूत झालेले बंटी शेळके यांच्याशिवाय हलबा समाजाचे डॉक्टर नंदा पराते आणि रमेश पुणेकर शर्यतीत आहे.. उत्तर नागपूर हा मतदारसंघ काँग्रेस नेते नितीन राऊत यांचा बालेकिल्ला आहे. त्यांच्याविरोधात तगड्या चेहऱ्य़ाच्या शोधात भाजप आहे. नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार मोहन मतेना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून गिरीश पांडव यांचे नाव आघाडीवर असले तरी असले तरी विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे, नितीन कुंभारकरही शर्यतीत आहेत.संघ मुख्यालय असलेलं नागपूर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होतं. सध्या सहापैकी चार मतदारसंघावर भाजपचा वरचष्मा असला तरी विधानसभेत चित्र बदलेल असं काँग्रेसला वाटतंय. उत्तर नागपूर वगळता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कोणत्याच विधानसभा मतदारसंघात मोठं मताधिक्य मिळालं नाही पण तरीही मतदारराजाच्या भरवशावर काँग्रेसला चमत्काराची आशा आहे.