योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : आतापर्यंत आपण नंदुरबार, गडचिरोली अशा दुर्गम जिल्ह्यांमध्ये गर्भवती आदिवासी महिलांना झोळीने प्रसुतीसाठी नेले जात असल्याचं आपण नेहमीच ऐकत होतो. मात्र संपूर्ण राज्यातील आदिवासींचा विकास करणाऱ्या आदिवासी आयुक्तालय नाशिकमध्येही (Nashik News) असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे. शासन यंत्रणेच्या कारभाराचा फटका आदिवासी नागरिकांना चांगलाच बसला आहे. रस्ता नसल्याने तब्बल अडीच किलोमीटर पायपीट केलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृतदेह घरी नेण्यासाठी सुद्धा झोळीचा वापर करावा लागला आहे. करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाला लाज आणणारी अशी ही घटना आहे.
इगतपुरीच्या तळोघ जुनवणेवाडी येथील गरोदर महिलेला रस्ता नसल्याने प्राण गमवावा लागला आहे. वनिता भाऊ भगत असे मयत महिलेचे नाव आहे. प्रसुतीच्या वेदना येत असल्याने संबंधित गरोदर महिला आपल्या नातेवाईकांसह मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अडीच किलोमीटर पायी चालत दवाखान्यापर्यंत पोहोचली होती. मात्र पायपीट, प्रसुतीवेदना आणि पाऊस यामुळे झालेल्या विलंबामुळे आपल्या आई वडिलांसोबत ती घोटी येथील शासकीय रुग्णालयात गेली. त्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात या महिलेने दवाखान्यात प्राण सोडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृतदेह नेताना सुद्धा चक्क झोळीचा वापर करावा लागला आहे.
नेमकं काय घडलं?
वनिता भगत असे मृत महिलेचे नाव आहे. इगतपुरीतील तळोघ ग्रामपंचायतीमध्ये जुनवणेवाडीमध्ये त्या राहत होत्या. या आदिवासी वस्तीपासून गावकऱ्यांना मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी अडीच किलोमीटर कच्च्या रस्त्याने पायपीट करावी लागते. पावसामुळे हा रस्ता पावसामुळे चिखलमय झाला होता. मंगळवारी वनिता भगत यांना प्रसवेदना सुरू झाल्याने त्यांना रात्री अडीच वाजता नातेवाईकांसह मुख्य रस्त्यापर्यंत पायपीट करावी लागली. तळोघ येथे आल्यानंतर वनिता यांना वाहनाद्वारे घोटी येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. मात्र वनिता यांची अवस्था पाहून त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात वनिता यांनी प्राण सोडला.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर वनिता यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी नेतानाही कुटुंबियांना कसरत करावी लागली. नाशिकहून वाहनाद्वारे वनिला यांचा मृतदेह इगतपुरी तालुक्यात आणण्यात आला. त्यानंतर तळोघपासून पुन्हा जुनवणेवाडीपर्यंत मृतदेह नेण्यासाठी डोली करावी लागली आहे.